PM Modi : ऐतिहासिक क्षण! अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिमाखात धर्मध्वज फडकला!

•हवा चिरत 191 फूट उंचीवर ध्वज स्थिरावला; राम मंदिरावरील ‘तो’ क्षण पाहून पंतप्रधान मोदी भावूक!
ANI :- उत्तर प्रदेशातील अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वानंतर आज, 25 नोव्हेंबर रोजी, मंदिराच्या शिखरावर भगवा धर्मध्वज मोठ्या दिमाखात फडकला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले आणि या भव्य सोहळ्याला सरसंघचालकही उपस्थित होते.




हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाचा जयघोष आणि मंत्रोच्चारांच्या साथीने, कोविदार वृक्ष आणि तेजस्वी सूर्याची प्रतिमा चिन्हांकित झालेला भव्य भगव्या रंगाचा धर्मध्वज मंदिरावर सन्मानाने फडकवण्यात आला.
दैवी भावनांचा क्षण
राम मंदिराच्या या सोहळ्यात एक अत्यंत भावनिक आणि दैवी अनुभव देणारा क्षण पाहायला मिळाला. बटन दाबताच मंत्रघोषांच्या उच्चारात राम मंदिराचा धर्मध्वज कळसाच्या दिशेने वर जाऊ लागला. हवेचा प्रचंड जोर असतानाही हा धर्मध्वज 191 फूट उंचावर असलेल्या राम मंदिराच्या कळसावर अचूकपणे जाऊन स्थिरावला.
पंतप्रधान मोदी आणि उपस्थित जनसमुदाय डोळ्यांमध्ये हे दृश्य साठवत असताना, धर्मध्वज कळसावर स्थिरावला तेव्हा पंतप्रधान मोदी यांचे मन दैवी भावनांच्या संचाराने अक्षरशः सद्गदित झाले. धर्मध्वज मंदिराच्या कळसावर पोहोचला तेव्हा खाली उभे असलेल्या नरेंद्र मोदींचे जोडलेले हात भावना आवेगाने थरथरताना स्पष्ट दिसले. हे दृश्य पाहून उपस्थित जनसमुदाय भारावून गेला.
धर्मध्वजाचा संदेश
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, “सत्याचाच विजय होतो, असत्याचा नाही. सत्य हेच ब्रह्मस्वरुप आहे, सत्य हाच धर्म आहे. ‘प्राण जाये पर वचन न जाये’, हा संदेश राम मंदिरावरील हा धर्मध्वज देईल.”
यासोबतच, आपल्याला असा समाज निर्माण करायचा आहे, जिथे गरीबी नसेल, कोणी दु:खी किंवा लाचार नसेल, तिकडे कोणताही भेदभाव किंवा समस्या नसतील. हा धर्मध्वज या प्रेरणेचे प्रतिक असेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
रामध्वजाची वैशिष्ट्ये
रामध्वज हा जमिनीपासून 191 फूट उंचीवर आहे.
161 फूट उंचीच्या शिखरावर 42 फूट उंचीचा हा रामध्वज आहे.
ध्वज केशरी रंगाचा असून, त्याची रुंदी 11 फूट आणि लांबी 22 फूट आहे.
बटन दाबताच रामध्वजा दोरीवरून वरच्या टोकाला पोहचून फडकला.



