क्राईम न्यूजमुंबई
Trending

Vasai Murder News : वडिलांच्या मदतीने मुलाने केला आईचा खून; वसईत खळबळजनक घटना

Vasai Latest Murder News : ‘व्हिडिओ गेम’च्या पैशासाठी वयोवृद्ध आईची हत्या; पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न

वसई :- वसई पश्चिम येथील पेरियार अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 61 वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यात मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-2, वसईला मोठे यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात मृत महिलेच्या सावत्र मुलानेच ‘व्हिडिओ गेम’ खेळण्यासाठी पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत महिलेच्या पतीने मुलाला वाचवण्यासाठी पुरावे नष्ट करण्याचा आणि मृत्यूचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. Vasai Latest Murder News

अशी उघड झाली क्रूर घटना

27 जुलै 2025 रोजी रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखा कक्ष-2 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, 26 जुलै 2025 रोजी डी-मार्टसमोरील पेरियार अपार्टमेंटमधील डी/101 मध्ये राहणाऱ्या आशिया खुसरु (वय 61) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या पतीने आणि इतर जवळच्या नातेवाईकांनी मृतदेहाचे शवविच्छेदन न करता धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करून मृतदेह दफन केला होता. बातमीदाराने हा मृत्यू अपघात नसून खून असल्याची खात्रीशीर माहिती दिली होती.

या माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवले. वरिष्ठांच्या आदेशानुसार, त्यांनी गुन्हे शाखा कक्ष-2 चे पोलीस पथक तयार करून घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील नातेवाईक, साक्षीदार, भौतिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले.

व्हिडिओ गेमच्या पैशासाठी मातेचा बळी

तपासादरम्यान, पोलिसांनी मयत आशिया खुसरु यांचा सावत्र मुलगा मो. इम्रान अमिर खुसरु (वय 32, रा. भाटपाडा, गोखिवरे, वसई पूर्व) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला इम्रान पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु गुन्हे शाखा कक्ष-2 च्या तपास पथकाने कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. इम्रानला ‘व्हि.आर.पी.ओ.’ नावाच्या ऑनलाईन गेम खेळण्यासाठी 1.80 लाख रुपयांची गरज होती. त्याने हे पैसे त्याची सावत्र आई आशिया खुसरु यांच्याकडे मागितले, परंतु त्यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. या रागातून इम्रानने आशिया यांच्या डोके राहत्या घरातील किचन ते हॉलमधील पॅसेजमधील वॉश बेसिनजवळील भिंतीच्या अणकुचीदार कॉर्नरवर आपटले आणि त्यांच्या तोंडावर लाथा मारून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने आशिया यांच्या बेडरूममधील कपाटातून दोन सोन्याच्या बांगड्या आणि एक सोन्याची चेन असे मौल्यवान ऐवज चोरले.

वडिलांनीही केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

इम्रानने खुनाची माहिती वडील मो. अमीर मो. इस्माईल खुसरु (वय 65, रा. भाटपाडा, गोखिवरे, वसई पूर्व) यांना दिली. मुलाने केलेल्या खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने, अमीर खुसरु यांनी घटनास्थळी सांडलेले रक्त पुसून टाकले. तसेच, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका परिचित डॉक्टरांकडून पत्नीच्या मृत्यूचे बनावट प्रमाणपत्र मिळवले. पत्नीचा मृत्यू घरात जमिनीवर पडल्यामुळे डोक्याला झालेल्या जखमांमुळे झाल्याचा खोटा बनाव करून त्यांनी नातेवाईक आणि इतरांना माहिती दिली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून धार्मिक रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले.

या संवेदनशील घटनेबाबत सखोल चौकशीअंती, गुन्हे शाखा कक्ष-2 मध्ये नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून वसई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1), 238, 239, 303(2), 61(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उप निरीक्षक अजित गिते, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, प्रतिक गोडगे, राज गायकवाड, रामेश्वर केकान, अविनाश चौधरी आणि सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0