
Mumbai BMC Election Latest News : “उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू”; भाजप नेत्याच्या वक्तव्यावर ठाकरे गट आक्रमक, मराठी अस्मितेचा मुद्दा तापला
मुंबई | आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC Election 2026) रणधुमाळीत आता ‘प्रादेशिक अस्मिते’चा वाद उफाळून आला आहे. भाजपचे उत्तर भारतीय चेहरे आणि नेते कृपाशंकर सिंह यांनी “मुंबईत उत्तर भारतीय समाजाचा महापौर बनेल,” असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या विधानाचा समाचार घेताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी याला “मराठी माणसाचा अपमान” आणि “भाजपचा माज” असे संबोधले आहे.
नेमके काय म्हणाले कृपाशंकर सिंह?
मिरा-भाईंदरसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीची सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त करताना कृपाशंकर सिंह यांनी मुंबईच्या महापौरपदाबाबत मोठे विधान केले. ते म्हणाले, “उत्तर भारतीय समाजाचे इतके नगरसेवक निवडून येतील की मुंबईत उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसेल. उत्तर भारतीय समाज हा केवळ मतदार नाही, तर तो या शहराचा भागीदार आहे.”
“हा भाजपचा माज आहे”; सचिन अहिरांचे प्रत्युत्तर
कृपाशंकर सिंह यांच्या विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सचिन अहिर यांनी यावर टीका करताना म्हटले की,”भाजपच्या हिंदी भाषिक नेत्यांची एवढी हिंमत? मुंबईचा महापौर हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे अशी चेतावनी देणे, हा मराठी माणसाचा अपमान आहे. हा त्यांचा माज असून, मुंबईतील मतदार या निवडणुकीत तो उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भाषिक नागरिकाचा हा अपमान आहे.”
निवडणुकीच्या तोंडावर ‘उत्तर भारतीय’ फॅक्टर
मुंबई महापालिकेत उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षणीय आहे. भाजप आणि शिंदे गट या मतांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना, कृपाशंकर सिंह यांच्या या विधानामुळे ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा वाद रंगण्याची शक्यता आहे. विशेषतः उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाल्यानंतर ‘मराठी अस्मिता’ हा निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला असतानाच हे वक्तव्य आल्याने महायुतीची कोंडी होऊ शकते.
चौरंगी लढत आणि 2516 उमेदवार
मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी एकूण 2516 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांनी आपापले मोहरे तैनात केले आहेत. 16 जानेवारी 2026 रोजी कोणाचा महापौर बसणार, याचा निकाल स्पष्ट होईल. मात्र, तत्पूर्वी कृपाशंकर सिंह यांच्या वक्तव्याने प्रचारात मोठी ‘ठिणगी’ पडली आहे.
मुंबई महापालिका निवडणूक महत्त्वाची आकडेवारी
एकूण उमेदवार: 2516
मतदान तारीख: 15 जानेवारी 2026
निकाल तारीख: 16 जानेवारी 2026


