Thane News : ठाणे शहर पोलिसांचा “निर्भय ठाणे” व्हॉट्सॲप चॅटबॉट नागरिकांच्या सेवेत

ठाणे : ठाणे शहर पोलीस दल अधिक जनताभिमुख करण्याच्या उद्देशाने व पोलीसांच्या विविध सेवा उपक्रम प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “निर्भय ठाणे” WhatsApp Chat Bot सेवेला आज (दि. 29 ऑगस्ट 2025) अधिकृतपणे प्रारंभ करण्यात आला. या सेवेचे लोकार्पण पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
या नव्या डिजिटल उपक्रमांतर्गत मोबाईल क्रमांक 70394 55555 वर संपर्क साधून नागरिकांना विविध सोयी उपलब्ध होणार आहेत. त्यामध्ये – ऑनलाईन तक्रार नोंदणी, ई-चलन भरणा, हरविलेल्या/सापडलेल्या वस्तूंची नोंद, सायबर गुन्ह्याविषयी तक्रार, भाडेकरू नोंदणी, जवळचे पोलीस ठाणे, लाईव्ह ट्रॅफिक अपडेट्स, आपले सरकार सेवा, कायदेविषयक कलमांची माहिती तसेच अभिप्राय नोंदविणे अशा सेवा समाविष्ट आहेत.
“सदैव सेवेत, सदैव तत्पर” या ब्रीदवाक्याप्रमाणे ठाणे पोलीस आयुक्तालयाने जनतेला अधिक कार्यक्षम सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला असून नागरिकांनी या नव्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


