Bhiwandi Crime News : भिवंडीत भाजप युवा नेत्याची व चुलतभावाची निर्घृण हत्या; राजकीय वर्चस्वाचा वाद की जुना राग?

Bhiwandi Crime News : प्रफुल्ल व तेजस तांगडी यांचा कार्यालयात तलवार-सुऱ्यांनी खून; 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी :- भिवंडीत सोमवारी रात्री भीषण दुहेरी हत्याकांड उघडकीस आले आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्यांचे चुलतभाऊ तेजस तांगडी यांची कार्यालयात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. दोन हल्लेखोरांनी चेहऱ्यावर रुमाल बांधून तलवारी आणि सुऱ्यांनी वार करत दोघांना जागीच गंभीर जखमी केले. तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. Bhiwandi Latest Crime News
घटनेनंतर प्रफुल्ल यांच्या नातेवाईकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. या दुहेरी खुनामागे पूर्ववैमनस्य की राजकीय वर्चस्वाचा वाद, याचा तपास सुरू आहे. प्रफुल्ल यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचा कट रचला गेला होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांनी प्रफुल्ल यांच्या चुलत भावाच्या तक्रारीवरून पायेगाव येथील 12 संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हत्याकांडानंतर भिवंडीत तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.


