मुंबई

चैत्यभूमीवर ‘महापरिनिर्वाण दिना’ची जय्यत तयारी! – बेस्ट उपक्रमाकडून विशेष बस, विद्युत व्यवस्था आणि आरोग्य शिबिराचे आयोजन

•69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंच्या अनुयायांसाठी सोयीसुविधा सज्ज; गतवर्षीच्या तुलनेत अधिक सेवा

मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6 डिसेंबर) मुंबईतील चैत्यभूमीवर 5 आणि 6 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्ट उपक्रमाने व्यापक तयारी केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक विद्युत व्यवस्था, जादा बस सेवा, तसेच आरोग्य आणि अल्पोपहाराच्या सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

अखंडित विद्युतपुरवठा आणि प्रकाश योजना

चैत्यभूमी परिसरातील मंडप आणि तंबू यांना निवासी दराने तात्पुरता विद्युतपुरवठा करण्यासाठी बेस्टने अर्ज करण्याचे आवाहन केले होते.

छत्रपती शिवाजी पार्क मैदान आणि वनिता समाज येथे विद्युतपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी राखीव पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

शिवाजी पार्क, चैत्यभूमी, राजगृह आणि दादर चौपाटीसह विविध ठिकाणी 159 वॅटचे 781 एलईडी मार्गदर्शक दिवे आणि 2000 वॅटचे तीन मेटल हलाईड दिवे बसविण्यात येणार आहेत.

6 किलो वॅटचे तीन शोधप्रकाश दिवे (Search Lights) विशेष मनोऱ्यांवर बसविले जाणार आहेत.

जादा बस आणि दर्शन सेवा :- बेस्ट उपक्रमाने 5 आणि 6 डिसेंबर रोजी अनुयायांच्या सोयीसाठी विशेष बस सेवा सुरू केली आहे.

जादा बस :- उपनगरांतून चैत्यभूमीपर्यंत ये-जा करण्यासाठी रात्री 10 पासून शनिवार, 6 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत विविध मार्गांवर 17 जादा बसगाड्या धावतील. तसेच, 6 डिसेंबर रोजी दिवसभरात विविध मार्गांवर एकूण 42 जादा बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहेत.

स्मृतीस्थळ दर्शन :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मृतीस्थळांना भेट देण्यासाठी 5 व 6 डिसेंबर रोजी शिवाजी महाराज उद्यान येथून 10 विशेष वातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्यात येणार आहेत. याचे भाडे प्रतिप्रवासी 75 आहे. शिवाजी पार्क आणि परिसरामध्ये अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान वाहतूक अधिकारी आणि बस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरोग्य सुविधा आणि जनजागृती

बेस्ट उपक्रमाने यावर्षीही मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. याशिवाय डासांपासून होणारे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया, तसेच क्षयरोग आणि हृदयरोगाबाबत माहितीपत्रकाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुर्धर रोगांबाबत जनजागृती करून व्यसनमुक्तीसाठी उपचार देखील उपलब्ध असणार आहेत.यासोबतच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित मोफत पुस्तके अनुयायांना देण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0