मुंबई

Kalyan Crime News : अमानुष! चार वर्षांच्या बालिकेचा मावशीच्या पतीकडून खून

•वर्षभरानंतर उघडकीस आलेले क्रूर हत्याकांड; कोळसेवाडी पोलिसांनी दाम्पत्याला केली अटक

कल्याण :- घरात सांभाळायला कोणी नसल्याने मावशीकडे गेलेल्या एका चार वर्षांच्या बालिकेचा तिच्या काकाने रागाच्या भरात केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या मावशी आणि तिच्या पतीला कोळसेवाडी पोलिसांनी वर्षभरानंतर अटक केली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी अपर्णा अनिल मकवाना उर्फ अपर्णा कांबरी आणि तिचा पती प्रथमेश प्रवीण कांबरी या दाम्पत्याला अटक केली आहे. ते रायगड जिल्ह्यातील भिवपुरी-चिंचवली येथील रहिवासी आहेत.

गेल्या वर्षी कल्याण पूर्वेतील खडेगोळवली येथे राहणाऱ्या ज्योती सातपुते यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आपल्या चार वर्षांच्या भाचीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. मुलीचे वडील राहुल घाडगे तुरुंगात असल्याने मुलीला सांभाळण्यासाठी तिच्या मावशीकडे, म्हणजेच अपर्णा कांबरी यांच्याकडे पाठवण्यात आले होते. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते.

गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी प्रथमेश आणि अपर्णा हे त्यांच्या मूळ गावी चिंचवली येथे येणार आहेत. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या दाम्पत्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी लहान असल्याने तिच्याकडून काही चुका होत होत्या. एक दिवस घरात प्रातर्विधी केल्याने संतापलेल्या प्रथमेशने रागाच्या भरात तिला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर रात्रीच्या वेळी दोघांनी बालिकेचा मृतदेह गोणीत भरून एका गादीत गुंडाळून चिंचवली परिसरातील एका निर्जनस्थळी फेकून दिला. पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली असून, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0