Vasai Crime News : खुनी आरोपीला तब्बल 4 वर्षांनंतर पंजाबमधून अटक; पोलिसांचा ‘पॅरोल’वरील फरार कैद्यांचा शोध यशस्वी!

Vasai Crime Branch Latest News : गुन्हे शाखेच्या पथकाने बिहार ते पंजाब असा पाठलाग करत आरोपी शंकर मुखीयाला बेड्या ठोकल्या
वसई :- चार वर्षांपासून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून फिरणाऱ्या खुनाच्या गुन्ह्यातील एका शिक्षा भोगत असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात गुन्हे शाखा, कक्ष-2, वसईला मोठे यश मिळाले आहे. पॅरोलवर सुटल्यानंतर कारागृहात हजर न होता हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकाने बिहार ते पंजाब असा पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या.
हा थरारक पाठलाग सुरू झाला होता 2016 सालच्या एका खुनाच्या गुन्ह्यापासून. नालासोपारा येथे शंकर जगदीश मुखीया उर्फ समोसेवाला याने एका क्षुल्लक वादातून दिलीप बसनेत या व्यक्तीचा गळा चिरून खून केला होता. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावली होती आणि तो ठाण्याच्या कारागृहात शिक्षा भोगत होता.
2022 मध्ये, शासनाच्या नियमांनुसार, शंकर मुखीयाला पॅरोलवर सोडण्यात आले. परंतु, रजेचा कालावधी संपल्यावर त्याने कारागृहात परत जाण्यास नकार दिला. तो आपल्या मूळ पत्त्यावर न जाता, आपली ओळख लपवून वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करू लागला. ही गोष्ट जेल प्रशासनाच्या लक्षात आल्यावर, त्यांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, आरोपी पोलिसांना सतत चकवा देत होता.
पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेच्या कक्ष-2 च्या पथकाने या ‘पळपुट्या’ आरोपीचा तपास सुरू केला. तो मूळ बिहारचा असल्याने त्याच्या मूळगावीही शोध घेण्यात आला, पण तिथे तो नव्हता. आरोपी सतत नाव आणि ठिकाण बदलत असल्यामुळे तपास अधिकच गुंतागुंतीचा झाला होता.
अखेरीस, दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, शंकर मुखीया पंजाबमधील शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यात राहत आहे. मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून, पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ पंजाब गाठले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी सदर बंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपी शंकर मुखीयाला अटक केली.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सोपान पाटील, सागर शिंदे, पोलीस उप निरीक्षक, अजित गिते, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक/संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, सुधीर नरळे, राहुल कर्पे, दिलदार शेख, अनिल साबळे, प्रतिक गोडगे, राज गायकवाड, रामेश्वर केकान, अविनाश चौधरी, सर्व नेम गुन्हे शाखा कक्ष-2 वसई तसेच सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


