Alibhaug Bribe News : “पाच हजारांची लाच… आणि महावितरणचा अभियंता जाळ्यात!”

Alibhaug Latest Bribe News : उच्चदाब विद्युत वाहिनी स्थलांतराच्या परवान्यासाठी मागितले पाच हजार,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अलिबाग | महावितरणच्या पेण सर्कल कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता संजय प्रदीप जाधव यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली, त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचार उजेडात आला आहे. Alibhaug Latest ACB Trap News
खालापूर येथील एका जमीनमालकाने त्याच्या मालकीच्या जागेतील महावितरणच्या उच्चदाब वाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी अर्ज केला होता. या कामासाठी सक्षम एंटरप्रायझेस या कंपनीला अधिकृत करून तांत्रिक परवान्यासाठी महावितरणच्या पेण कार्यालयात प्रयत्न सुरू होते. याच प्रक्रियेत उप कार्यकारी अभियंता जाधव यांनी परवान्यास गती देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली.
या व्यवहाराची तक्रार 7 जुलै 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. 8 जुलै रोजी पंचासमक्ष पडताळणी दरम्यान लाचेची मागणी स्पष्ट झाली, आणि लगेचच सापळा रचण्यात आला. दुपारी साडेतीन वाजता जाधव यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांच्या पथकात निरीक्षक किरणकुमार वाघ, अरुंधती येळवे, विशाल अहिरे, प्रमिला विश्वासराव, उमा बासरे, निखिल चौलकर आणि योगिता चाळके यांचा समावेश होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


