क्राईम न्यूजपुणे
Trending

Pune Breaking News : पुणे मनपा आयुक्तांच्या बंगल्यातून मौल्यवान वस्तू गायब; मनसे आक्रमक

Pune Latest News : नवे आयुक्त नवल किशोर राम यांच्या घरातून 4 एसी, झुंबर, टीव्हीसह अनेक वस्तू चोरीला; 20 लाखांची निविदा काढण्याची तयारी

पुणे :- पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या शासकीय निवासस्थानातून मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मनसेने या प्रकरणी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुक्त नवल किशोर राम यांनी जाब विचारण्यासाठी गेलेल्या मनसे कार्यकर्त्यांना अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप झाल्याने, मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

पुण्याचे नवे आयुक्त म्हणून नवल किशोर राम यांनी नुकताच पदभार स्वीकारला. चित्तरंजन वाटिका येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानात राहण्यास जाण्यापूर्वी, विद्युत आणि सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घराची पाहणी केली. त्यावेळी घरातून अनेक मौल्यवान वस्तू गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामध्ये चार एसी, एक मोठे झुंबर, ऐतिहासिक चित्रांसह अन्य कलाकृती, जुन्या काळातील पितळी व कांस्य धातूचे दिवे, दोन मोठे एलईडी टीव्ही, कॉफी मेकर, वॉकीटॉकी सेट, रिमोट बेल्स, चिमणीसह सुसज्ज किचन टॉप आणि वॉटर प्युरिफायर अशा वस्तूंचा समावेश आहे.

या वस्तू नेमक्या कुठे गेल्या, याविषयी प्रशासनात जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रशासनाने 20 लाख रुपयांची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या गंभीर प्रकरणावर जाब विचारण्यासाठी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आपल्या कार्यकर्त्यांसह आयुक्तांच्या कार्यालयात गेले. यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांनी कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हा प्रकार गंभीर असून, या चोरीमागे कोण आहे आणि बेपत्ता झालेल्या वस्तूंचा शोध कधी लागणार, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0