महाराष्ट्र

Manoj Jarange On Chitra Wagh : मनोज जरांगे यांचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार, म्हणाले ‘तुम्ही तेव्हा कुठे होता?’

•‘मी फडणवीसांच्या आईला काहीही बोललो नाही’, वादग्रस्त वक्तव्यावरून जरांगे यांचे स्पष्टीकरण

जालना :- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता आणखीच पेटला आहे. जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी वाघ यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “मी फडणवीसांच्या आईला काहीही बोललो नाही, तरीही त्या शब्दांवर आक्षेप असेल तर ते मी मागे घेतो. पण, जेव्हा आमच्या आया-बहिणी पोलिसांच्या लाठीहल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तेव्हा तुम्ही कुठे होत्या?” असा सवाल जरांगे यांनी विचारला आहे.

समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करत वाघ यांनी जरांगे यांच्यावर फडणवीस यांच्या आईबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप केला होता. यावर जरांगे म्हणाले की, “चित्रा वाघ म्हणतात मी शिवी दिली. पण, मी कोणालाही शिवी दिलेली नाही. तरी त्यांना असं वाटत असेल, तर ज्या शब्दांवर त्यांचा आक्षेप आहे ते शब्द मी मोठ्या मनाने मागे घेतो. पण, आम्हाला आरक्षण द्या. कारण, आमच्या आया-बहिणी राब राब राबतायत, त्यांची लेकरं आत्महत्या करत आहेत. तुम्ही तुमच्या आईप्रमाणेच आमच्या आईकडे पाहा आणि तिच्या लेकरांना आरक्षण द्या.”

जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेत म्हटले की, “त्या बाईला (चित्रा वाघ) रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आमची आई दिसली नाही का? तेव्हा ती बाई कुठे गेली होती? कधीपर्यंत सरकारच्या शाळा सांभाळणार? आमच्या लहान लहान मुली, तीन-चार वर्षांच्या मुली पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झाल्या, रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा तू झोपा काढत होतीस का? तेव्हा तुझी जात जागी झाली नाही का? तू कोणाच्याही नादी लाग, पण माझ्या नादी लागू नको. नाहीतर तुझे सगळे घोटाळे बाहेर काढीन.”

यावेळी जरांगे यांनी चित्रा वाघ यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “चित्रा वाघ फडणवीसांसाठी बोलत आहेत, कदाचित त्यांना आमदार किंवा खासदार व्हायचं असेल. मी त्यांना सांगू इच्छितो की, अनेक लोक आत्महत्या करत आहेत. त्यांच्या आईकडे देखील बघ. उगाच काहीही बोलून मूळ मुद्दा भरकटवू नको. माझी आई दोन लाखांची साडी नेसत नाही, पण फाटकी लुगडी नेसलेली आमची आई आम्हाला प्रिय आहे. माझा व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करता, पण जेव्हा आमच्या आया-बहिणींना मारलं, तेव्हा ते व्हिडिओ का शेअर केले नाहीत?” असा थेट हल्ला जरांगे यांनी चढवला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0