Chembur Accident News : चेंबूरमध्ये भरधाव रिक्षाची धडक; शाळकरी बहिणींना चिरडले!

Chembur Accident News : एक गंभीर, शीव रुग्णालयात उपचार सुरु; रिक्षाचालक फरार
मुंबई | चेंबूर येथे भरधाव रिक्षाने धडक दिल्याने शाळेतून घरी परतणाऱ्या दोन सख्या बहिणी गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. Chembur Accident News या अपघातात एका विद्यार्थिनीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालक घटनेनंतर तात्काळ फरार झाला असून, देवनार पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
तनीक्षा खंदारे (9 वय) आणि सिदीक्षा खंदारे (6 वय) अशी या जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोन्ही बहिणी चेंबूरमधील नारायण गुरू शाळेतून गोवंडी परिसरातील त्यांच्या घरी जात असताना, सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शाळेपासून काही अंतरावरच त्यांना भरधाव वेगात आलेल्या एका रिक्षाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही मुली रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर रिक्षाचालकाने कसलीही मदत न करता, घटनास्थळावरून धूम ठोकली.
जखमी झालेल्या मुलींना त्यांच्या ओळखीच्या एका महिलेने तात्काळ गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. सिदीक्षाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला पुढील उपचारांसाठी शीव रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सिदीक्षाचे वडील अजय खंदारे (43 वय) यांनी या प्रकरणी रविवारी देवनार पोलीस ठाण्यात अनोळखी रिक्षाचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार रिक्षाचालकाचा कसून शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे चेंबूर परिसरात संताप व्यक्त होत असून, अशा बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


