
Thane Kalyan Latest Political Update : काँग्रेस-मनसेचे बडे चेहरे शिंदेंच्या शिवसेनेत; कोपरी भाजपचा मात्र युतीला कडाडून विरोध
कल्याण | राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे Eknath Shinde यांची शिवसेना ‘महायुती’ म्हणून एकत्र लढणार असल्याची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, या निर्णयामुळे युतीमध्ये ‘कुठे उत्साह, तर कुठे संघर्ष’ असे चित्र पाहायला मिळत आहे. एकीकडे कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि मनसेच्या बड्या नेत्यांचा ‘मेगा प्रवेश’ होत असताना, ठाण्यात मात्र भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेसोबतच्या युतीविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे.
ठाण्यात युतीची पहिली ‘ठिणगी’
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीची अधिकृत घोषणा केली असली, तरी ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांना हा निर्णय रुचलेला दिसत नाही. कोपरी मंडळ भाजपचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत शिवसेनेसोबतच्या युतीवर तीव्र हरकत नोंदवली आहे. शिवसेनेने यापूर्वी भाजपवर कशा प्रकारे कुरघोडी केली, याचा पाढाच त्यांनी वाचला. यासंदर्भात त्यांनी ठाणे निवडणूक प्रभारी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांना लेखी निवेदन देऊन आपली नाराजी स्पष्ट केली आहे. यामुळे ठाण्यात ‘युती धर्म’ पाळला जाणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याणमध्ये शिंदेंची ‘ताकद’ वाढली;
पोटे आणि देसाईंचे ‘धनुष्यबाण’ ठाण्यात नाराजी असताना, कल्याण-डोंबिवलीत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना मोठे धक्के दिले आहेत.
काँग्रेसला खिंडार: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका जानवी पोटे आज शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. पोटे यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला होता.
मनसेला धक्का: मनसेचे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांच्या पत्नी कस्तुरी देसाई हे देखील आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘जय महाराष्ट्र’ करण्याची दाट शक्यता आहे. कल्याण पूर्वेतील दादासाहेब गायकवाड क्रीडांगणात सायंकाळी हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
युती एकदिलाने काम करणार का?
कल्याण-डोंबिवली हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र याच भागात भाजप आणि शिवसेना यांच्यात स्थानिक पातळीवर मोठी चुरस आहे. उद्धव ठाकरे यांना रोखणे हे महायुतीचे मुख्य उद्दिष्ट असले, तरी स्थानिक कार्यकर्त्यांमधील हेवेदावे वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. ठाण्यातील भाजपच्या हरकतीमुळे युतीच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


