Beed Bribe News : लाच घेताना कनिष्ठ लिपिक रंगेहात पकडला – बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी कारवाई

•जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा – पाच हजार रुपयांची लाच घेताना कारवाई
बीड :- भ्रष्टाचाराविरोधात लढा देणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी काल (20 मे) मोठी यशस्वी कारवाई करत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक-2,बीड येथील कनिष्ठ लिपिक कृष्ण वसुदेव मुंडे (वय 37) यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली.
तक्रारदार हे बेलगाव (ता. आष्टी) येथील ‘जगदंबा देवी मजूर सहकारी संस्था’ चे चेअरमन असून, संस्थेच्या नूतनीकरण प्रक्रियेसाठी आवश्यक वर्गीकरण पत्र मिळविण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावावर कार्यवाही करताना आरोपी लिपिकाने 7 मे 2025 रोजी पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, आरोपी लिपिकाने तक्रारदाराकडून स्वतःसाठी लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. आज बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक2 च्या कार्यालयात सापळा रचण्यात आला. लिपिक मुंडे यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वीकारली आणि त्यांना रंगेहात पकडण्यात आले.याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीला अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण बगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकामध्ये पोलीस हवालदार गिराम, गोरे, गारदे, पोलीस शिपाई राठोड, गवळी, पुरी यांनी सहभाग घेतला. ही यशस्वी कारवाई संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक), मुकुंद आघाव (अप्पर पोलीस अधीक्षक), व शंकर शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


