Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदरवर भाजपचे वर्चस्व; विरोध डावलून डिंपल मेहता महापौरपदी, तर ध्रुवकिशोर पाटील उपमहापौर

•मराठी एकीकरण समितीचे आंदोलन निष्फळ; 79 मतांच्या भक्कम बहुमताने भाजपचा विजय
मीरा-भाईंदर | गेल्या काही दिवसांपासून ‘मराठी महापौर’ या मुद्द्यावरून पेटलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. मराठी एकीकरण समितीचा तीव्र विरोध झुगारून भारतीय जनता पक्षाने मीरा-भाईंदर महानगरपालिकेत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपच्या डिंपल मेहता यांची 79 मतांनी महापौरपदी, तर ध्रुवकिशोर पाटील यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली आहे.
भाजपचे एकगठ्ठा मतदान
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपने आपली ताकद दाखवून दिली. भाजपचे 78 नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाने हात वर करून डिंपल मेहता यांच्या बाजूने मतदान केले. विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार रुबीना शेख यांना केवळ 16 मते मिळाली. त्यामुळे डिंपल मेहता यांनी 63 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत कोणीही माघार न घेतल्याने प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली.
प्रताप सरनाईकांचा मराठी एकीकरण समितीवर प्रहार
या निवडीनंतर आमदार प्रताप सरनाईक यांनी आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीवर जोरदार टीका केली. “ही समिती निवडणुकीच्या वेळी कुठे होती? त्यांनी उबाठा आणि मनसेला पाठिंबा देऊन आमचे 28 मराठी नगरसेवक पाडले. जर तेव्हा आम्हाला साथ दिली असती, तर आज ही वेळ आली नसती,” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच शहरात 80 टक्के अमराठी समाज असून याआधीही गीता जैन आणि नरेंद्र मेहता लोकप्रतिनिधी झाले होते, तेव्हा विरोध का झाला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठी महापौरचा मुद्दा का गाजला?
निवडणुकीनंतर मीरा-भाईंदरमध्ये मराठी महापौर असावा, अशी मागणी करत मनसे आणि मराठी एकीकरण समितीने आंदोलन छेडले होते. अमराठी महापौर नको, असा सूर आळवत आज महापालिकेवर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र, भाजपने आपल्या बहुमताच्या जोरावर ही मागणी फेटाळून लावत डिंपल मेहता यांच्या नावे शिक्कामोर्तब केले.


