Mira Road Crime News : राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘ठगास’ अटक

•मध्यवर्ती गुन्हे शाखेची उत्तर प्रदेशातून मोठी कारवाई; आरोपी प्रदीप गर्गने विविध जिल्ह्यांमध्ये केली कोट्यवधींची फसवणूक
मिरा रोड :- महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक करून फरार झालेल्या प्रदीप रविंद्र गर्ग या ठगाला मीरा-भाईंदर-वसई-विरारच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर गर्गने जामिनाच्या अटींचे उल्लंघन करत आपला ठावठिकाणा लपवला होता.
प्रदीप गर्ग याच्यावर धाराशिव, रत्नागिरी, सोलापूर, हिंगोली, लातूर आणि सातारा अशा अनेक जिल्ह्यांतील पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली अनेक सामान्य नागरिकांना गंडा घातला होता.
चिपळूण पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर गर्ग हा न्यायालयासमोर हजर न राहता फरार झाला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द करून त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने प्रदीप गर्गचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला 9 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील मुधहाफर नगर येथून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला चिपळूण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशानुसार आणि दत्तात्रय शिंदे, संदीप डोईफोडे आणि मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.


