Rohit Pawar : रोहित पवारांचा सरकारला सवाल: ‘नवीन आका’ कोण, गृहखातं मुसक्या कधी आवळणार?

•पुण्यातून धाराशीवपर्यंत दहशतीची साखळी; पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण.
मुंबई: महाराष्ट्रात राजकीय आश्रयामुळे ‘आका’ (गुंड) आणि त्यांच्या टोळ्यांची साखळी तयार होत असल्याचा गंभीर आरोप करत आमदार रोहित पवार यांनी थेट सरकारलाच धारेवर धरले आहे. पुण्यात दहशत माजवणाऱ्या एका ‘आका’ने पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट धाराशीवपर्यंत आपली मजल मारली असून, त्याच्या टोळीने पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करत धुमाकूळ घातल्याचा आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार रोहित पवारांनी ट्विटद्वारे समोर आणला आहे. त्यांच्या या ट्विटने राज्याच्या राजकारणात आणि गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
बीड आणि सांगलीनंतर धाराशीवमध्ये हा तिसरा ‘आका’.
रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, या ‘आका’च्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करायला पुढे येत नाहीये. त्यांनी बीड आणि सांगलीनंतर आता धाराशीवमध्ये तयार होणारा हा तिसरा ‘आका’ कोण, या ‘आका’चा ‘आका’ कोण, आणि गृहखाते या ‘आका’च्या मुसक्या का आवळत नाही, असे थेट प्रश्न विचारले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत, “पोलीस की इज्जत का सवाल है! कधी आवळताय या नवीन आकाच्या मुसक्या?” असा सवाल करत गृहखात्याच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतला आहे.


