Santosh Dhuri : मुंबईत मनसेला ‘दे धक्का’; राज ठाकरेंचे शिलेदार संतोष धुरी यांचा भाजपमध्ये प्रवेश!

•ठाकरे बंधूंकडून मराठी माणसाचे ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ सुरू; धुरींचा जुन्या सहकाऱ्यांवर बोचरा वार
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा सुरुंग लागला आहे. मनसेचे खंदे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी 22 वर्षांची साथ सोडून अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. “ज्यांनी पक्षच सरेंडर करायचे ठरवले आहे, त्यांच्याबद्दल आता काय बोलणार?” अशा शब्दांत त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत मनसेला रामराम ठोकला आहे.
इमोशनल ब्लॅकमेलिंगचा आरोप
पक्षप्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना संतोष धुरी यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे हे भावनिक करण्यात माहीर आहेत. ते नेहमीच इमोशनल ब्लॅकमेलिंग करत असतात. आता तर दोन्ही भावांनी मिळून मराठी माणसाला भावनिक जाळ्यात ओढायला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या वेळीच यांना मराठी माणूस आठवतो का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘पक्ष संपला’ म्हणणाऱ्यांसोबतच घरोबा?
धुरी यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जुन्या विधानांची आठवण करून दिली. “काही दिवसांपूर्वीपर्यंत हे लोक मनसेला ‘संपलेला पक्ष’ म्हणत होते. आता मात्र सोयीनुसार एकत्र येत आहेत. कालच्या बदलेल्या राजकीय भूमिकेनंतर मला अनेक फोन आले, त्यातून लोकांच्या मनात प्रचंड संताप असल्याचे मला समजले,” असे धुरी यांनी नमूद केले.
संदीप देशपांडेंशी मैत्री कायम, पण रस्ते वेगळे
मनसे नेते संदीप देशपांडे यांच्याशी असलेल्या संबंधांवर बोलताना ते भावूक झाले. “संदीप देशपांडे माझे नेते होते, आमची मैत्री आजही कायम आहे. चहा पिण्यासाठी आम्ही नक्कीच एकत्र भेटू, पण आता आमचे पक्ष वेगळे असल्याने राजकीय चर्चा बंद होतील. राजकीय धडे मात्र आम्ही एकमेकांकडून घेतच राहू,” असे त्यांनी स्पष्ट केले.
15 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल!
22 वर्षांनंतर पक्ष सोडताना काहीतरी विचार केलाच असेल, असे सांगत धुरी यांनी भाजपवर विश्वास व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस मला योग्य न्याय देतील याची खात्री आहे. पक्ष सोडल्याचा पश्चाताप नक्की कोणाला होणार, हे येत्या 15 तारखेनंतर अवघ्या महाराष्ट्राला कळेल,” असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.


