
Kalyan Latest Traffic Update : सोमवारपासून दुर्गाडी परिसरात संध्याकाळी जड वाहनांना प्रवेशबंदी
कल्याण :- ऐतिहासिक परंपरा असलेला कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवी नवरात्रोत्सव सोमवार, 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या काळात दुर्गाडी किल्ला परिसर आणि शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांसाठी संध्याकाळी 4 ते रात्री 12 या वेळेत कल्याण शहरात जड आणि अवजड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. Kalyan Latest Traffic Update
वाहतूक कोंडी टाळण्याचा प्रयत्न
नवरात्रोत्सवादरम्यान दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी जत्रा भरते आणि हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याशिवाय, दुर्गाडी किल्ला परिसरातून जाणाऱ्या गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्यावरही वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. ही कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्ग
नवी मुंबई, पनवेल, पुणे भागातून येणाऱ्या वाहनांसाठी: शिळफाटा दत्तमंदिर चौकातून प्रवेश बंद असेल. ही वाहने मुंब्रा-खारेगाव जुना टोलनाका, मुंबई-नाशिक महामार्गाने पुढे जातील.
तळोजा खोणी बाह्यवळण रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांसाठी: काटई-बदलापूर रस्त्यावरील निसर्ग ढाब्याजवळ प्रवेश बंद असेल. ही वाहने काटई चौक, पलावा चौक, कल्याण फाटामार्गे जातील.
बदलापूरकडून नेवाळी नाक्यामार्गे येणाऱ्या वाहनांसाठी: नेवाळी नाका येथे प्रवेशबंदी असेल. ही वाहने बदलापूर-अंबरनाथ महामार्गाने इच्छितस्थळी जातील.
उल्हासनगरकडून श्रीराम चौकातून येणाऱ्या वाहनांसाठी: श्रीराम चौकात प्रवेश बंद असेल. ही वाहने उल्हासनगर, अंबरनाथ, शहाडमार्गे पुढे जातील.
मुरबाड, शहाड, उल्हासनगरहून कोनगाव-भिवंडीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी: आधारवाडी चौकात प्रवेश बंद असेल. ही वाहने आधारवाडी पूल, बापगाव, पडघामार्गे जातील.
ठाणे, भिवंडीकडून येणाऱ्या वाहनांसाठी: भिवंडी जवळील रांजनोली नाका येथे प्रवेश बंद असेल. ही वाहने मुंबई-नाशिक महामार्गमार्गे जातील.
यापूर्वी अनेकदा नवरात्रोत्सवादरम्यान शहर वाहतूक कोंडीने ठप्प झाले होते. यावर्षीच्या या निर्णयामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. वाहतूक विभागाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.


