Chhagan Bhujbal : ‘मराठा आरक्षण’ वादात छगन भुजबळ यांची भूमिका गुलदस्त्यात; मंत्रिमंडळ बैठकीत भुजबळ उपस्थित

Chhagan Bhujbal Latest News : भुजबळ मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहणार अशी चर्चा; अचानक निर्णय बदलला, सर्वांचे लक्ष भूमिकेकडे
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनानंतर सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या जीआरला ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध असून, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीही या जीआरला विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज (9 सप्टेंबर) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळ उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मराठा आरक्षणाच्या जीआरला ओबीसी नेत्यांचा विरोध; दोन दिवसांत हायकोर्टात याचिका दाखल करणार
गेल्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकणाऱ्या भुजबळ यांनी आजच्या बैठकीलाही गैरहजर राहणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी आपला निर्णय बदलला आणि ते मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहिले. यामुळे भुजबळ नेमकी कोणती भूमिका घेणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
भुजबळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
मंत्रिमंडळ बैठकीनंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासन निर्णयाबद्दल निवेदन देणार आहेत. माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. हा एक सामाजिक विषय असून, यात राजकारण आणू नये. ओबीसी नेत्यांमध्ये सध्या आक्रोश आहे, आणि तो व्यक्त करणे गरजेचे आहे.” ते पुढे म्हणाले की, दोन दिवसांत या जीआर विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत.
ओबीसी आणि मराठा समाजात मतभेद
मराठा आरक्षणासंदर्भात समाजातही मतभेद आहेत. काहीजण या जीआरचा फायदा होईल असे मानतात, तर काहींच्या मते यामुळे कोणताही फायदा होणार नाही. या पार्श्वभूमीवर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील भुजबळांची उपस्थिती आणि त्यानंतरची त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


