
Mumbai Water Cut News : पालिकेकडून व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम; ‘एच पश्चिम’ विभागातील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबई :- मुंबईतील वांद्रे, खार आणि सांताक्रूझ पश्चिम परिसरातील काही भागांतील नागरिकांना येत्या शनिवारी, 22 नोव्हेंबर रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने हे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. Mumbai Water Cut News
दुरुस्तीचे कारण
मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्या इनलेटवरील व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. शनिवार, 22 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
या परिसरांना फटका
दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, मात्र या कामामुळे ‘एच पश्चिम’ विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे:
दांडपाडा, गजधरबंध झोपडपट्टीचा काही भाग.
खार पश्चिमेचा काही भाग आणि कांतवाडी परिसराचा काही भाग.
पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन व माला गावाचा काही भाग.
खारदांडा कोळीवाडा, च्युइम गावठाण.
हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन उद्यान मार्ग क्रमांक 1 ते 4, पाली हिल आणि च्युइम गावाचा काही भाग.
पालिकेचे आवाहन
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने ‘एच पश्चिम’ विभागातील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचे आणि दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पुढील 4 ते 5 दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याची सूचनाही पालिकेने दिली आहे.


