
Ashish Shelar Compare Mumbai With Pahalmgam : “मराठी अस्मिता आणि दहशतवाद एकत्र कसे?” – काँग्रेस-शिवसेनेचा रोष
मुंबई | “पहलगाममध्ये अतिरेक्यांनी हिंदूंना धर्म विचारून मारलं आणि मुंबई मनसे कार्यकर्ते भाषा विचारून अमराठींना मारत आहेत” – सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी केलेल्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवली आहे.
मनसेसह काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी शेलारांवर टीकेची झोड उठवत, त्यांच्या वक्तव्याला “धोरणशून्य आणि अपमानजनक” ठरवलं आहे.
मनसेचे अविनाश जाधव म्हणाले, “मराठीबद्दल चुकीचं बोलाल, तर गाठ मराठ्यांशीच आहे. महाराष्ट्रात राहायचं असेल, तर मराठी बोलावंच लागेल.”
शेलारांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, “मराठी आंदोलनाच्या आडून काही पक्ष ‘भीती पसरवा आणि मते मिळवा’ ही इंग्रजांची रणनीती वापरत आहेत. दोन कुटुंबं एकत्र आली, यात आनंद आहे, पण त्याच्या नावाखाली अनुचित वर्तन चालणार नाही.” त्यांनी यावेळी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या भाषणांनाही टोकाचं अप्रासंगिक ठरवत, संपूर्ण मेळाव्याला “अवास्तव” म्हटलं.
या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला – “दोन बंधू भेटले म्हणून शेलारांना पहलगाम आठवावं, हे दुर्दैवी आहे. पाकिस्तानात शंभर अतिरेकी मारल्याचा दावा करता, पण पहलगामचे दहशतवादी आजही मोकाट आहेत!”
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही ताशेरे ओढत म्हटलं – “राज्यात शिंदे-फडणवीसांनी आता ‘रडण्याचा कार्यक्रम’ जाहीरपणे सुरू करावा.”


