
CM Devendra Fadnavis On Savarkar : मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, लंडनमधील बार-एट-लॉ पदवीसाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न सुरू
मुंबई – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर बहाल करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अधिकृत प्रयत्नांना सुरूवात केली आहे. CM Devendra Fadnavis On Savarkar मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ऐतिहासिक निर्णय मंगळवारी मुंबई विद्यापीठात झालेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास व संशोधन केंद्रा’च्या उद्घाटनप्रसंगी जाहीर केला.
मुंबई विद्यापीठाने नुकतीच सावरकरांची ‘बी.ए.’ पदवी परत केली, जी इंग्रजांनी त्यांच्या क्रांतिकारक भूमिकेमुळे काढून घेतली होती. आता सरकार त्यांना लंडनमधील ग्रेझ इन लॉ कॉलेजमधून मिळालेली ‘बॅरिस्टर’ पदवी देखील परत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत आहे.
फडणवीस म्हणाले, “सावरकरांना मरणोत्तर ‘बॅरिस्टर’ पदवी बहाल करणे ही आमची ऐतिहासिक जबाबदारी आहे. नव्याने उघडलेल्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून या कार्याला गती मिळावी, यासाठी आम्ही केंद्र सरकारशी समन्वय साधणार आहोत.”
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “ब्रिटिश सरकारच्या पत्रांमध्ये सावरकर यांना सर्वात धोकादायक क्रांतिकारक ठरवले गेले होते. त्यामुळेच त्यांच्या पदव्या काढून घेतल्या. जर मार्सेल्सच्या बंदरावर त्यांना अटक झाली नसती, तर देशाचा इतिहास वेगळा असता.” त्यांनी सावरकरांवरील टीकाकारांवरही टीका करत म्हटले की, “जे त्यांना ‘माफीवीर’ म्हणतात, त्यांनी अंडमानच्या सेल्युलर जेलमध्ये 11 तास तरी जावून बघावे.”
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उपस्थित होते. याच कार्यक्रमात गृह मंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र ते वैयक्तिक कारणांमुळे अनुपस्थित राहिले. तथापि, त्यांनी मुंबईत सावरकर कुटुंबीयांची भेट घेतली.
प्रो. चिरायु पंडित, ज्यांनी ‘The Man Who Could Have Prevented Partition’ हे पुस्तक लिहिले आहे, त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी म्हटले, “महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक आणि योग्य दिशेने उचललेले पाऊल आहे.”


