Rajan Vichare : ठाण्याच्या राजकारणात ‘बच्चा’ विरुद्ध ‘आजोबा’ वाद पेटला! राजन विचारेंचं नरेश म्हस्केंना खरमरीत पत्र

•Rajan Vichare Wrote Letter To Naresh Mhaske ऑपरेशन सिंदूरच्या बॅनरवरून रात्री राडा; युवासेनेत बाचाबाची, ठाण्याचे राजकारण तापले
ठाणे: ठाण्याच्या राजकारणात माजी खासदार आणि ठाकरे गटाचे नेते राजन विचारे आणि विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांच्यातील शाब्दिक युद्ध आता एका नव्या पातळीवर पोहोचले आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या “बच्चा” विरुद्ध “आजोबा” वादाला आता विचारे यांनी म्हस्केंना थेट पत्र लिहून आणखी धार दिली आहे. या पत्रात राजन विचारे यांनी नरेश म्हस्के यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यात “ऑपरेशन सिंदूर” या विचारे यांच्या विधानावरून शिंदे गटाने बॅनर लावले होते. हे बॅनर काढण्यावरून काल रात्री ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या युवासेनेत जोरदार बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर राजन विचारे यांनी नरेश म्हस्केंना पत्र लिहिले असून, यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलं?
राजन विचारे यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर देखील पोस्ट केलं आहे. “त्यांच्या वाचाळ टीकेवर राष्ट्रभक्ताचे हे प्रत्युत्तर” असं कॅप्शन या पत्राला विचारे यांनी दिलं आहे. दरम्यान आता विचारे यांच्या पत्राला मस्के काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा ठाण्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे
काही वर्ष आधी स्वतः काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होता, मी तुम्हाला थांबवले, असं या पत्रात राजन विचारे यांनी नरेश मस्के यांना उद्देशून लिहिलं आहे. तसेच पत्रात म्हस्के यांचा वाचाळवीर, उंदीर, टेंडर सेटर असा उल्लेख करण्यात आला आहे. ‘मातोश्री , उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षाबद्दल बोलताना जरा जपून , सुसंकृत राजकारण करा , मला तुमचे पुस्तक उघडायला लाऊ नका नाहीतर भारी पडेल’ असा इशाराही या पत्रातून राजन विचारे यांनी म्हस्के यांना दिला आहे.


