Bribe Case : भ्रष्ट सरकारी वकिलाला कारावास! 59 हजारांची लाच घेणाऱ्या संध्या बच्छाव यांना ठाणे न्यायालयाची शिक्षा

Vashi Lawyer Bribe Case : वाशी येथील गुन्ह्यात युक्तीवादासाठी मागितली होती लाच; एसीबीच्या जाळ्यात अडकल्या होत्या रंगेहात
ठाणे | न्यायालयात तक्रारदाराच्या बाजूने भक्कम युक्तीवाद करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संध्या दिनकर बच्छाव यांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकसेविका पदाचा गैरवापर करून आर्थिक फायद्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने हा निकाल दिला. Vashi Latest Bribe Case
नेमके प्रकरण काय होते?
तक्रारदाराने वाशी पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे एक गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यामध्ये न्यायालयात तक्रारदाराच्या बाजूने चांगल्या प्रकारे युक्तीवाद (Argument) करण्यासाठी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संध्या बच्छाव यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेचा पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांना रंगेहात पकडले होते. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाचा निकाल आणि शिक्षा
मालिक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. शिंदे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि पुराव्यांची दखल घेत बच्छाव यांना दोषी ठरवले. त्यांना खालीलप्रमाणे शिक्षा सुनावण्यात आली आहे.
कलम 7 अन्वये: 6 महिने साधा कारावास आणि 1000 रुपये दंड (दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त कारावास).
कलम 13(1)(ड) व 13(2) अन्वये: 6 महिने साधा कारावास आणि 1000 रुपये दंड (दंड न भरल्यास 2 महिने अतिरिक्त कारावास).
तपास पथकाची कामगिरी
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी केला होता, तर सध्या पोलीस निरीक्षक सुनील कारोटे (ACB, ठाणे) यांनी पाठपुरावा केला. सरकारी वकील संजय मोरे यांनी सरकारची बाजू मांडली. या खटल्याच्या यशस्वी कामकाजासाठी स्टार केस निरीक्षक विजय कावळे, महिला पोलीस हवालदार अनिता पाटील आणि पोलीस हवालदार सतीश ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.


