Badlapur Crime News : बदलापूर हादरलं! ट्युशनला जाणाऱ्या चिमुकलीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग; मैत्रिणीने डोळ्यात माती फेकून सोडवली सुटका

•प्रसंगावधान राखणाऱ्या मैत्रिणीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक; पोलिसांनी आरोपीला अंबरनाथमधून ठोकल्या बेड्या; पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
बदलापूर | बदलापूर पूर्व परिसरात ट्युशनला जाणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीचा हात धरून विनयभंग करणाऱ्या एका नराधम रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेत पीडित मुलीसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने दाखवलेल्या विलक्षण धाडसामुळे एका मोठ्या अनर्थाला रोखण्यात यश आले आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले असून, महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मैत्रिणीचे ‘ते’ धाडस आणि नराधमाचा प्रयत्न
मिळालेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी 10 वर्षांची पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत ट्युशनला जात होती. यावेळी एका रिक्षाचालकाने तिचा रस्ता अडवून तिचा हात पकडला. पीडित मुलीने विरोध करूनही तो तिचा हात सोडत नव्हता. अशा संकटकाळी घाबरून न जाता, सोबत असलेल्या मैत्रिणीने जमिनीवरची माती उचलून थेट रिक्षाचालकाच्या डोळ्यात फेकली. डोळ्यात माती गेल्यामुळे रिक्षाचालकाची पकड ढिली झाली आणि दोन्ही मुलींनी तिथून तात्काळ पळ काढला.
सीसीटीव्हीच्या आधारे अवघ्या काही तासात अटक
मुलींनी हा प्रकार घरी सांगितल्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि आरोपी रिक्षाचालकाची ओळख पटवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अंबरनाथ येथून आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली.
पोलीस कारवाई आणि न्यायालयीन कोठडी
पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. “लहान मुलांसंदर्भातील गुन्हे आम्ही अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत आहोत. या प्रकरणातही तातडीने तपास करून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे,” अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी दिली.


