Amit Thackeray-Ashish Shelar : गणेशोत्सवासाठी ‘मनविसे’ आक्रमक; अमित ठाकरेंनी थेट आशिष शेलारांना भेटून केली परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

•‘हा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव’, अमित ठाकरेंची सरकारकडे मागणी
मुंबई :- महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज सकाळी भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन गणेशोत्सव काळात सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांना एक निवेदनही दिले आहे, ज्यात त्यांनी कठोर शब्दांत इशारा दिला आहे की, जर सरकारने विद्यार्थ्यांच्या भावनांचा विचार केला नाही, तर मनविसे राज्यभर तीव्र आंदोलन करेल.
‘गणेशोत्सव काळात परीक्षा झाल्यास आंदोलन करू’, अमित ठाकरेंचा इशारा
मुंबईतील वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या कार्यालयात ही भेट झाली. यावेळी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण नसून तो महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख आहे. विद्यार्थी आपल्या कुटुंबासह, समाजासह या उत्सवात सहभागी होणे हे त्यांच्या सांस्कृतिक नाळ जपण्यासाठी आवश्यक आहे.
अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात मुख्यत्वे तीन मागण्या केल्या आहेत
- राज्यातील सर्व बोर्डाच्या (SSC, CBSE, ICSE, CISCE, इत्यादी) शाळा आणि सर्व प्रकारच्या महाविद्यालयांना (सरकारी, खाजगी आणि अभिमत विद्यापीठे) गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या काळात (गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी) कोणत्याही परीक्षांचे आयोजन करू नये, असे आदेश सांस्कृतिक मंत्रालयाने तात्काळ द्यावेत. तसेच, या काळात निश्चित केलेल्या परीक्षा तात्काळ पुढे ढकलण्यात याव्यात.
- सरकारच्या या धोरणाला विरोध करणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांवर तातडीने कारवाई करण्यात यावी.
- विद्यार्थ्यांना या राज्य महोत्सवात मनःपूर्वक सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.


