Ajit Pawar : मिटकरी पुन्हा मैदानात! प्रवक्तेपदावरून हटताच अजित पवारांनी सोपवली स्टार प्रचारकाची मोठी जबाबदारी

Ajit Pawar Latest News : धनंजय मुंडेंचेही अंशतः पुनर्वसन; वादग्रस्त वक्तव्यांच्या चर्चांना अजितदादांकडून पूर्णविराम!
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात अवघ्या तीन दिवसांपूर्वी प्रवक्तेपदावरून दूर करण्यात आलेल्या आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. मिटकरींसोबतच माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही स्टार प्रचारकपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी पक्ष संघटनेत भाकरी फिरवत अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह काही प्रवक्त्यांना पदमुक्त केले होते. त्यावेळी वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि महायुतीतील पक्षांमध्ये कटुता निर्माण होत असल्याच्या चर्चांमुळेच अमोल मिटकरी यांची उचलबांगडी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. मात्र, अवघ्या काही दिवसांतच अजित पवार यांनी मिटकरींवर स्टार प्रचारकपदाची नवी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
तसेच, संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे मंत्रीपद सोडावे लागलेल्या धनंजय मुंडे यांनाही अजित पवारांनी स्टार प्रचारकपदाची जबाबदारी देऊन अंशत: पुनर्वसन केले आहे. मंत्रीपद सोडल्यानंतर पक्षात फारसे सक्रिय नसलेल्या मुंडेंनी मध्यंतरी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे ‘माझ्यावर कोणतीही जबाबदारी द्या’, अशी विनंती केली होती. अखेर त्यांनाही स्टार प्रचारक म्हणून संधी मिळाली आहे.
या प्रमुख नेत्यांव्यतिरिक्त लातूर येथील मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आलेले सूरज चव्हाण आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात पक्षाची बाजू मांडणार आहेत. याशिवाय, पक्षाकडून सर्व मंत्र्यांसह अभिनेते सयाजी शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरही स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन आपली हकालपट्टी झाल्याचे वृत्त फेटाळून लावत अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. “अजित दादांचा कार्यकर्ता असायला नशिब लागतं, तितका नशिबवान मी आहे. आज अजित दादांच्या विचाराचा प्रचारक आणि कार्यकर्ता म्हणून आपल्याकडे असलेले पद माझ्यासाठी सर्वोच्च आहे,” असे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले होते.


