
Devendra Fadnavis Share Raj Thackeray Old Clip : शिवाजी पार्कवर राज आणि उद्धव ठाकरेंच्या संघर्षाचा फ्लॅशबॅक; जुन्या क्लिप्स शेअर करत मुख्यमंत्र्यांचा जोरदार हल्लाबोल
मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी Mumbai BMC Election सुरू असलेल्या प्रचाराचा धडाका आज अखेरच्या टप्प्यात पोहोचला असून, 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानापूर्वी राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. प्रचाराच्या या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेत विरोधकांचे वाभाडे काढले. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या गाजलेल्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ या शैलीचा वापर करत फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील गेल्या 20 वर्षांतील संघर्षाचा एक विशेष व्हिडीओ सादर केला. हाच व्हिडीओ आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवर शेअर केल्याने सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात “मी कुणाकडून तरी शब्द उधार घेतोय,” असे म्हणत हा मीम स्वरूपातील व्हिडीओ जनतेसमोर मांडला. सुमारे 3 मिनिटे 19 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना का सोडली, इथपासून ते उद्धव ठाकरे आणि त्यांच्यातील शाब्दिक युद्धापर्यंतच्या अनेक जुन्या क्लिप्सचा समावेश आहे. यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केलेले गंभीर आरोप आणि विश्वासार्हतेवर उपस्थित केलेले प्रश्न अधोरेखित करण्यात आले आहेत. तसेच, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावरही राज ठाकरेंनी केलेल्या खोचक टिप्पण्या या व्हिडीओत मजेशीर पद्धतीने गुंफण्यात आल्या आहेत.
केवळ कौटुंबिक आणि राजकीय संघर्षावरच नव्हे, तर मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरही या व्हिडीओच्या माध्यमातून निशाणा साधण्यात आला. राज ठाकरे यांनी महापालिकेच्या 40 हजार कोटींच्या हिशेबावरून शिवसेनेला विचारलेले जाब या क्लिपमध्ये दाखवण्यात आले आहेत. विरोधकांनी एकमेकांवर केलेले हेच आरोप आता त्यांच्याविरोधात शस्त्र म्हणून वापरण्याची रणनीती भाजपने आखल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
भाषणाच्या उत्तरार्धात फडणवीस यांनी केवळ व्हिडीओच नव्हे, तर काही महत्त्वाचे फोटोही सादर केले. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे उद्योजक गौतम अदाणी यांच्यावर टीका करत असताना, काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्री मात्र त्यांच्याकडून मोठी गुंतवणूक कशी पदरात पाडून घेत आहेत, याचे वास्तव फडणवीसांनी मांडले. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल आणि कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी अदाणींसोबत केलेल्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीचे दाखले देत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा दुटप्पीपणा उघड केला. गुंतवणुकीला विरोध करणाऱ्यांच्या राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे, हे फोटोंच्या माध्यमातून स्पष्ट करत त्यांनी मतदारांना विचार करण्याचे आवाहन केले आहे. आज प्रचाराची सांगता होत असताना या व्हिडीओ वारामुळे निवडणुकीच्या रिंगणात नवी रंगत निर्माण झाली आहे.


