मुंबई

Shinde Vs Thackeray : मुंबईत शिंदे-ठाकरे गटात पुन्हा राडा! प्रभादेवीत सुशोभीकरणावरून जोरदार वाद

•दोन्ही गटांना पालिकेकडून ‘वर्क ऑर्डर’, सर्कलवर आमनेसामने; दादर पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल

मुंबई :- आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील राजकारण पुन्हा एकदा तापायला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईतील प्रभादेवी परिसरात सुशोभीकरणाच्या कामावरून शुक्रवारी ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. हा वाद इतका वाढला की दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात दोन्ही गटांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुन्हा एकदा दादर-माहीम विधानसभा मतदारसंघ चर्चेत; पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले

प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणाच्या कामावरून हा वाद सुरू झाला. दोन्ही गटांना या कामासाठी महापालिकेकडून ‘वर्क ऑर्डर’ (Work Order) मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. याच वर्क ऑर्डरवरून आज सकाळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते प्रभादेवी सर्कलवर आमनेसामने आले. यातून शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तणावपूर्ण झाले.

शिंदे गटाचे आमदार समाधान सरवणकर यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. “आमच्याकडे या कामाची वर्क ऑर्डर आहे आणि त्यासाठी निधीही उपलब्ध झाला आहे,” असे ते म्हणाले. “यापूर्वीही सदा सरवणकर यांनी या चौकासाठी निधी आणून काम केले होते. काही लोक दुसऱ्यांनी केलेल्या कामावर स्वतःची नावे लावत आहेत. त्यांना काम करायचे असेल तर त्यांनी डीपीडीसीमधून निधी आणावा,” अशी टीका त्यांनी केली.

जुना वाद पुन्हा चर्चेत

काही वर्षांपूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान याच प्रभादेवी परिसरात ठाकरे आणि शिंदे गटात मोठा वाद झाला होता. त्यावेळी शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप होता, ज्यामुळे मोठा गदारोळ झाला होता. तोच दादर-माहीम मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गटांमध्ये या मतदारसंघात वर्चस्व मिळवण्यासाठी मोठी राजकीय लढाई सुरू होण्याची शक्यता आहे. या वादावर पोलीस पुढील काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0