
Mumbai Latest Rain News : निचल्या भागांत पाणी साचले; विमानसेवा, वाहतूक व्यवस्था कोलमडली
मुंबई | राजधानी मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, पश्चिम उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषतः अंधेरी परिसरातील सबवेमध्ये सुमारे 4 ते 5 फूट पाणी साचल्याने ते पूर्णतः वाहतुकीसाठी बंद करण्यात आलं आहे. परिणामी, वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असून, वाहतूक पोलिसांनी कंबर कसून व्यवस्था सांभाळण्यास सुरुवात केली आहे. Mumbai Latest Rain Update
पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. लोकांना कार्यालय, शाळा, दवाखाने गाठण्यात अडथळे येत आहेत. अंधेरीसारख्या निचल्या भागात पाणी साचून परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. प्रशासनाकडून या भागांत पंपद्वारे पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका हवाई सेवांनाही बसला असून, इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांसाठी ट्रॅव्हल अॅडव्हायजरी जारी केली आहे. कंपनीने फ्लाइटमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करत, प्रवासापूर्वी फ्लाइट अपडेट्स तपासण्याचा सल्ला दिला आहे.
पोलिसांचा इशारा — समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहा, आपत्कालीन सेवांसोबत संपर्क ठेवा
मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून, समुद्रकिनारे आणि जलभरलेल्या भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी 100, 112 किंवा 103 या क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा, असं आवाहन पोलिस दलाकडून करण्यात आलं आहे.


