Mumbai Police News : हरवलेले पुन्हा सापडले!“ऑपरेशन शोध” मोहिमेचा दिलासा देणारा यशस्वी शेवट

213 हरवलेल्या महिला, 22 अपहृत बालकांसह 330 जणांचा ठावठिकाणा लागला,नवी मुंबई पोलिसांचा व्यापक शोध, सामाजिक संस्थांचा मोलाचा सहभाग
नवी मुंबई :- एका आईचे अश्रू, एका बहिणीचा धीर सुटलेला आवाज, आणि एका वडिलांची काळजी – ही वेदना “ऑपरेशन शोध” मोहिमेमुळे काहीशा कमी झाली. नवी मुंबई पोलिसांनी हरवलेल्या महिला व बालकांच्या शोधासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेत 330 जणांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळाले आहे.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार दिनांक 17 एप्रिल ते 15 मे 2025 या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ही मोहिम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली. 20 पोलीस पथके आणि 2 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकांच्या मदतीने, तसेच बाल कल्याण समिती, निरीक्षण गृह आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून ही मोहिम यशस्वी झाली.
या मोहिमेमुळे 213 महिला, 95 पुरुष, 10 अपहृत मुले आणि 12 अपहृत मुली अशा एकूण 330 व्यक्तींना शोधण्यात आले. ही केवळ आकडेवारी नसून, मागे राहिलेल्या कुटुंबीयांच्या मनात पुन्हा उमेद निर्माण करणारा एक सामाजिक विजय आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, हरवलेल्यांबाबत कोणतीही माहिती असल्यास 103 या हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
“ऑपरेशन शोध” ही केवळ पोलिसी मोहिम नव्हे, तर नातेसंबंधांची वीण पुन्हा घट्ट करणारा एक प्रयत्न ठरला आहे.


