Mumbai News : कल्याण-डोंबिवलीत भाजपचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; श्रीकांत शिंदे यांच्या गोटात भूकंप

•दिवंगत वामन म्हात्रेंचे चिरंजीव अनमोल म्हात्रे भाजपमध्ये दाखल; अत्यंत गुप्ततेने पार पडलेल्या पक्षप्रवेशाने शिंदेसेनेला जबरदस्त धक्का
कल्याण-डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या भाजपने मंगळवारी (18 नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अत्यंत गुप्तपणे आणि अचानक जोरदार धक्का दिला आहे. भाजपमध्ये कोण प्रवेश करणार याची प्रचंड उत्सुकता असताना, भाजपने शिवसेनेचे दिवंगत आणि अत्यंत प्रभावी नेते वामन म्हात्रे यांचे पुत्र अनमोल वामन म्हात्रे यांना आपल्या गळाला लावले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अनमोल म्हात्रे यांनी आपली पत्नी अश्विनी म्हात्रे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करत शिंदे गटाला रामराम ठोकल्याचे स्पष्ट झाले. वामन म्हात्रे यांचा कल्याण-डोंबिवलीत मोठा जनसंपर्क आणि राजकीय दबदबा होता; ते पाच टर्म नगरसेवक आणि चार वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते. वडिलांची ही मोठी राजकीय पुण्याई अनमोल म्हात्रे यांच्या पाठीशी असल्यामुळे, भाजपने श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात अत्यंत मोक्याचा ‘खेळाडू’ खेचल्याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून या महानगरपालिका क्षेत्रात भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष विकोपाला गेला होता. भाजपच्या या ‘सिक्रेट स्ट्राईक’मुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या या खेळीला शिंदे गट कसे आणि काय प्रत्युत्तर देतो, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


