Babanrao Lonikar : “माझ्या अंगातला शेवटचा थेंबही शेतकऱ्यांविरोधात नाही” — बबनराव लोणीकर

•वादग्रस्त वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचा इशारा, लोणीकरांनी घेतली यूटर्न
मुंबई | आईचा पगार, बापाची पेरणी, अंगावरचे कपडे… हे सारे सरकारचेच देणे!” या वादग्रस्त भाषणानंतर टीकेच्या झोडे झेलणारे भाजप आमदार बबनराव लोणीकर अखेर नरमले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट समज दिल्यानंतर लोणीकरांनी “शेतकऱ्यांविरोधात आयुष्यात पुन्हा बोलणार नाही,” अशी स्पष्ट प्रतिज्ञा केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना लोणीकरांनी भाजपवर टीका करणाऱ्या ट्रोलर्सना उद्देशून अत्यंत रोषपूर्ण आणि उपेक्षात्मक भाषेत वक्तव्य केलं होतं. “तुझ्या मायच्या, बायकोच्या, बहिणीच्या नावावर पैसे गेले… कपडे आमच्या सरकारचे, आणि तूच आम्हाला बोलतोस?” अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला होता. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गांभीर्याने घेत “ही भाषा अयोग्य आहे, आणि संबंधितांना समज दिली जाईल,” असं स्पष्ट केलं. त्यानंतर अवघ्या काही तासांतच लोणीकरांनी भूमिका बदलत, “माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरोधात काही बोलणार नाही,” अशी घोषणा केली.
लोणीकरांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, “मी ट्रोल करणाऱ्या कार्यकर्त्यांवर बोललो. आमची बोलीभाषा ग्रामीण आहे. आम्ही आईला ‘माय’ आणि वडिलांना ‘बाप’ म्हणतो. आमचा हेतू कधीही शेतकऱ्यांचा अपमान करण्याचा नव्हता. माझ्या मतदारांनी मला माय-बाप मानलं आहे. त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी हजार वेळा माफी मागतो.”


