Ratnagiri Latest Bribe News : गुहागरमध्ये जिल्हा परिषदेचा ‘बडा’ अधिकारी ACB जाळ्यात! – बिले मंजूर करण्यासाठी 7 हजारांची लाच घेताना उपअभियंता रंगेहात अटक

Ratnagiri Anti Corruption Bureau Latest News : रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई; जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयातच घातला सापळा
रत्नागिरी/गुहागर :- रत्नागिरी जिल्ह्याच्या शासकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. गुहागर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता (वर्ग 1) संजय तुळशीराम सळमाखे यांना 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. स्वतःच्या दालनातच लाचेची रक्कम स्वीकारणे सळमाखे यांना चांगलेच महागात पडले आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार हे एका बांधकाम ठेकेदाराकडे सुपरवायझर म्हणून काम पाहतात. संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाचे पहिले ‘रनिंग बिल’ (प्रथम धावते देयक) तयार करण्यात आले होते. या देयकावर आणि कामाच्या फोटोंवर स्वाक्षरी करण्यासाठी उपअभियंता संजय सळमाखे यांनी तक्रारदाराकडे 7,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती.
एसीबीचा सापळा आणि अटक
तक्रारदाराने 12 डिसेंबर रोजी सळमाखे यांची भेट घेतली असता ही मागणी करण्यात आली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, काल मंगळवारी (16 डिसेंबर) गुहागर येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला.
सळमाखे यांनी आपल्या दालनात तक्रारदाराकडून 7 हजार रुपये स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना पंचासमक्ष रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शन
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि रत्नागिरी घटकाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.


