
Chandrashekhar Bawankule On Mahavikas Aghadi : राज ठाकरेंचा हल्लाबोल, उद्धव आणि पवारांसह सर्व विरोधक एकत्र; बावनकुळेंचा कारवाईचा इशारा
मुंबई :- मतचोरी, मतदार यादीतील गैरव्यवहार आणि निवडणुकीतील कथित गैरव्यवहारांविरोधात राज्यातील विरोधक एकवटले आहेत. महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येत उद्या, 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात ‘सत्याचा मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. या महामोर्चात मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेस व डाव्या पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.
मोर्चा मार्गावर पोलीस परवानगीचा पेच
हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होऊन मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबणार आहे. मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून हा मोर्चा दुपारी 1 ते 4 या वेळेत काढण्याचे नियोजन आहे. मात्र, सूत्रांनुसार, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला अद्याप परवानगी दिलेली नाही.
पोलिसांची भूमिका अशी आहे की, आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची परवानगी आहे, परंतु आझाद मैदानाबाहेरून (जसे की महापालिका प्रवेशद्वारावर) मोर्चा काढल्यास परवानगी देता येणार नाही. परवानगी न मिळाल्याने महाविकास आघाडी आणि मनसेचा मोर्चा विनापरवाना निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचा थेट इशारा
या पार्श्वभूमीवर, राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. “उद्या मनसे आणि महाविकास आघाडीने विनापरवाना मोर्चा काढल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधक कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसच्या उपस्थितीवर संभ्रम
या सत्याच्या मोर्चाला काँग्रेस पक्षाकडून मोजक्याच नेत्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांना उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसचे इतर नेते सहभागी होतील की नाही, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. बिहार निवडणुकीमुळे काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी आणि मनसेपासून काहीसे अंतर ठेवून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.



