
Mira Bhayandar Police E Governance : 150 दिवसांच्या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक
मीरा-भाईंदर :- प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक बनवण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या 150 दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा’ मोहिमेत मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने अव्वल स्थान पटकावले आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालयांमध्ये या आयुक्तालयाने सर्वोत्तम कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.
काल, 29 ऑगस्ट रोजी या मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या मूल्यमापनामध्ये संकेतस्थळ, डॅशबोर्ड, ‘आपले सरकार’ पोर्टल, ई-ऑफिस प्रणाली, व्हॉट्सॲप चॅटबॉट, एआय (AI) आणि जीआयएस (GIS) तंत्रज्ञानाचा वापर यांसारख्या विविध निकषांवर सर्व विभागांची कामगिरी तपासण्यात आली. यामध्ये, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आयुक्तालयाच्या या नेत्रदीपक कामगिरीचे कौतुक केले. या मोहिमेचा अंतिम निकाल 2 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. ‘ही मोहीम यापुढे अधिक प्रभावीपणे राबवून पोलिसांकडून अशीच चांगली कामगिरी होत राहो’, अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


