
Mumbai BMC Latest News : भाजपकडून अनुभवी चेहऱ्यांना संधी; वैधानिक समित्यांच्या निवडी बिनविरोध होण्याची शक्यता
मुंबई | श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची घोषणा अखेर झाली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्यानंतर आता वैधानिक समित्यांच्या चाव्या कोणाकडे जाणार, याबाबतची उत्सुकता संपली आहे. भाजपने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांना संधी दिली आहे, तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी अनुभवी नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या दोन्ही उमेदवारांनी बुधवारी महापालिकेच्या चिटणीस विभागाकडे आपले अर्ज सादर केले असून, संख्याबळ पाहता त्यांची निवड बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत भाजपला बहुमत असल्यामुळे स्थायी समितीवरील 26 सदस्यांपैकी सर्वाधिक 10 सदस्य भाजपचे आहेत. या समितीच्या अध्यक्षपदासाठी मकरंद नार्वेकर आणि प्रकाश दरेकर यांचीही नावे चर्चेत होती, मात्र प्रदीर्घ अनुभव जमेला असलेल्या प्रभाकर शिंदे यांना पक्षाने प्राधान्य दिले आहे. शिंदे यांच्यासोबतच भाजपने सभागृह नेते गणेश खणकर, राखी जाधव आणि इतर तरुण नगरसेवकांनाही या समितीवर संधी दिली आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर आता भाजपचे पूर्ण वर्चस्व निर्माण होणार आहे.
दुसरीकडे, 22 सदस्य असलेल्या शिक्षण समितीवरही भाजपने 11 सदस्यांसह आपले वर्चस्व राखले आहे. या समितीच्या अध्यक्षपदासाठी राजेश्री शिरवडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. शिरवडकर यांचे नाव यापूर्वी महापौर पदाच्या शर्यतीतही होते, मात्र त्यांना आता शिक्षण समितीची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली मुंबईतील पालिका शाळांच्या कामाला गती मिळेल, अशी पक्षाला अपेक्षा आहे. या समितीवर डॉ. नील सोमय्या यांच्यासह अनेक अनुभवी नगरसेवकांची वर्णी लावण्यात आली आहे.
महायुतीच्या अंतर्गत समझोत्यानुसार, स्थायी आणि शिक्षण समिती भाजपकडे आली असली तरी सुधार आणि बेस्ट समिती शिवसेना (शिंदे) पक्षाला देण्यात येणार आहेत. या दोन समित्यांसाठीही बुधवारीच अर्ज भरण्याची मुदत असून, 20 फेब्रुवारीला शिक्षण आणि स्थायी समितीची तर 23 फेब्रुवारीला बेस्ट आणि सुधार समितीची अधिकृत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय आणि वैधानिक कामात आता भाजप आणि शिंदे गटाच्या या नव्या फळीचे वर्चस्व पाहायला मिळणार आहे.



