
Radha Krishna Vikhe Patil On Manoj Jarange Patil : बेमुदत आंदोलनावर जरांगे ठाम; आझाद मैदानात पोहोचणार
मुंबई :- मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतरही पोलिसांनी काही अटींवर एका दिवसाची परवानगी दिली आहे. मात्र, जरांगे पाटील हे बेमुदत आंदोलनासाठी आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवर, सरकारने आता सावध भूमिका घेत चर्चेची तयारी दर्शवली आहे.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मोर्चा निघण्याच्या दोन दिवसांपूर्वीच जरांगे यांच्या व्यक्तीशी बोलणे झाले होते, मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. काल नगरमध्येही त्यांना भेटण्याचे नियोजन होते, पण ते मुंबईला जाण्यावर ठाम होते. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो आम्ही दूर करू.”
‘मुंबईत चर्चेचा प्रयत्न करू’
विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, “आम्ही मनोज जरांगेंशी चर्चेसाठी तयार आहोत. मुंबईत एक समिती म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू. ते शांतपणे आंदोलन करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या मागण्या सार्थपणे मांडल्या जात आहेत.” उपसमितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा करून मनोज जरांगेंना भेटण्याची वेळ निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा-कुणबी एक आहेत: मराठा आणि कुणबी एकच असून, याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही.
- हैदराबाद-बॉम्बे गॅझेटियर लागू करा: हैदराबाद आणि बॉम्बे गॅझेटियर लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
- ‘सगे सोयरे’ अध्यादेश: ‘सगे सोयरे’ अध्यादेशाची अंमलबजावणी करून ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांचे सगे-सोयरे पोटजात म्हणून घ्यावेत.
- गुन्हे मागे घ्या: आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना मदत करावी.
- कायद्यात बसणारे आरक्षण: मराठा समाजाला कायद्यात बसणारे, कायमस्वरूपी आरक्षण मिळावे, ही त्यांची अंतिम मागणी आहे.
जरांगे पाटील मुंबईत पोहोचल्यानंतर सरकार चर्चेसाठी काय पाऊल उचलते आणि जरांगे त्यांची भूमिका बदलतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


