मुंबई

Sanjay Raut : ‘शेवटच्या रांगेतील’ फोटोवरून वाद पेटला, संजय राऊतांनी दिले प्रत्युत्तर

•‘मागे बसण्यामागचे कारण स्क्रीन दिसणे नव्हते,’ राऊतांचे स्पष्टीकरण; म्हस्केंच्या टीकेलाही जोरदार पलटवार

ANI :- दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मागे बसवल्याच्या फोटोंमुळे राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या वादाला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून होत असलेल्या टीकेला त्यांनी ‘फालतू लोक’ असे संबोधत, मागे बसण्यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे.

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे मागील रांगेत बसले असल्याचे फोटो व्हायरल झाले होते. यावरून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ‘ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली,’ अशी टीका केली होती.

यावर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले की, “मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. उद्धवजींना सुरुवातीला पुढे बसवले होते, पण समोर सुरू असलेले प्रेझेंटेशन स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही सगळेच पाठीमागे बसलो. भाजपच्या आयटी सेलवाल्यांनी हे समजून घ्यावे.” राऊत यांनी पुढे सांगितले की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी संपूर्ण घर दाखवले होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे यांचेही फोटो आहेत, जे या टीकाकारांनी पाहिलेले नाहीत. बैठकीत शरद पवार, कमल हासन यांसारखे प्रमुख नेतेही उपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नरेश म्हस्के यांच्या ‘महाराष्ट्राची लाज काढली’ या टीकेला उत्तर देताना राऊत म्हणाले, “त्या म्हस्केंना सांगा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडताना तुम्हाला मान-अपमान दिसला नाही का? दिल्लीत जाऊन मोदी-शहा यांची चाटुगिरी करताना तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र आठवला नाही का?”

यासोबतच त्यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या सरकारी पाहुण्याचा दर्जा महाराष्ट्राच्या गृह मंत्रालयाने काढून घेतला असल्याचा दावा केला आणि म्हस्के यांना याचे उत्तर देण्यास सांगितले. या आरोपांवर अद्याप शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या प्रकरणामुळे दिल्लीतील बैठकीचा वाद आता मुंबई आणि ठाण्यापर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0