Sharing Auto Price Hike : शेअरिंग रिक्षा भाड्यात अचानक वाढ; प्रवाशांचा संताप, प्रशासन गप्प

•चार प्रवाशांची बेकायदा वाहतूक थांबवताना, चालकांकडून भाडेवाढीचा खेळ
ठाणे | ठाणे शहरातील शेअरिंग रिक्षा चालकांनी अघोषित भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी अलीकडेच शेअरिंग रिक्षांमध्ये बेकायदा चौथ्या प्रवाशाची वाहतूक करणाऱ्या चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. मात्र, याच कारवाईचे कारण पुढे करत रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून वाढीव पाच ते दहा रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे.
पूर्वी ठाणे स्थानक ते तीन हात नाका या फक्त पाच ते सात मिनिटांच्या अंतरासाठी 10 रुपये आकारले जात होते. मात्र आता 15 रुपये भाडे घेतले जात आहे. वागळे इस्टेट, नितीन कंपनी, गावदेवी मंदिर परिसरातूनही याच पद्धतीने भाडेवाढीचे प्रमाण वाढले आहे.
प्रवासी दिपाली घाटपारडे म्हणाल्या, “आमच्यासारख्या नोकरदार वर्गावर या अचानक वाढलेल्या भाड्याचा मोठा आर्थिक परिणाम होतो आहे. काही दिवसांपूर्वी 20 रुपये भाडे 25 झाले, आणि आता 30 रुपये आकारले जात आहेत. हे अन्यायकारक आहे.”
ठाणे शहरात नोकरदार, विद्यार्थी व छोट्या उद्योजकांचा मोठा प्रवास शेअरिंग रिक्षांवर अवलंबून आहे. मात्र भाडेवाढीमुळे त्यांचे बजेट बिघडत आहे.
“रिक्षा चालकांनी अशी भाडेवाढ केली असल्यास ती बेकायदा आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाईल,” असे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी स्पष्ट केले.
कशाप्रकारे अधिकचे पैसे घेतले जात आहे
ठाणे स्थानक–तीन हात नाका: 10 वरुन 15 भाडेवाढ , वागळे इस्टेट रोड नं. 16/22: 20रु वरुन 25रु/30रु, सिडको–बाळकूम: 25रु वरुन 30रु, सिडको–कशेळी/काल्हेर: 30रु वरुन 40/50रु अशाप्रकारे अघोषित भाडेवाढ करण्यात आली आहे.


