मुंबई

Uddhav Thackeray : ‘मी तुम्हाला साथ देण्यासाठी आलो आहे, खचून जाऊ नका’; उद्धव ठाकरेंचा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भावनिक आधार

•मराठवाड्यात पावसाने होत्याचे नव्हते केले; एकरी 50 हजार रुपये देऊनही परवडत नाही, शेतकऱ्याची व्यथा

मराठवाडा :- अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांना धीर दिला. ‘माझ्या हातात काही नसले तरी, तुम्हाला साथ देण्यासाठी आलो आहे. कोणीही खचू नका आणि वेडवाकडं पाऊल उचलू नका,’ असे भावनिक आवाहन करत त्यांनी शेतकऱ्यांना आधार दिला.

शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या

गेल्या चार दिवसांपासून धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी अशा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचा उभा असलेला खरीप हंगाम पाण्याखाली गेला आहे. याच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर पोहोचले. शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपल्या व्यथा मांडल्या.

एका शेतकऱ्याने, भगवान अंकुश म्हस्के यांनी, ‘जेवायला परवडत नाही, एकरी 50 हजार रुपये देऊनही परवडत नाही,’ असे म्हणत आपले दुःख व्यक्त केले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी हात जोडून त्याला खचून न जाण्याची विनंती केली.

‘ही मदत पुरेशी नाही’

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली. ते म्हणाले, “मराठवाड्यात पहिल्यांदा उलट झाले आहे, पाणीच पाणी झाले आहे. सरकारने जाहीर केलेली मदत 2023 च्या निकषांनुसार असून, ती शेतकऱ्यांसाठी पुरेशी नाही.”

ते पुढे म्हणाले की, “तुमची मागणी जी आहे कर्जमाफीची ती आहेच. मला त्यात पडायचे नाही, नाहीतर पुन्हा लोक म्हणतील मी राजकारण करतो. पण या संकटातून आपल्याला बाहेर पडायलाच हवे.” त्यांनी सध्याच्या संकटाची तुलना भूतकाळातील कोणत्याही आपत्तीशी करता येणार नाही, असेही सांगितले.

ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून, आता सरकारकडून ठोस मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0