मुंबई

Uttrakhand News : उत्तराखंडमध्ये महाराष्ट्राचे 151 पर्यटक अडकले; गिरीश महाजन ‘संकटमोचक’ म्हणून बचावकार्यात

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर महाजन डेहराडूनमध्ये दाखल; 10 आयटीबीपी तुकड्या बचावकार्यात

मुंबई :- उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्राचे 151 पर्यटक अडकले आहेत. या सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांना डेहराडून येथे पाठवले आहे. ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाणारे महाजन डेहराडूनमध्ये दाखल झाले असून, बचावकार्याचा आढावा घेत आहेत.

राज्यातील पर्यटक अडकल्याची माहिती मिळताच, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनीही तात्काळ आपत्ती कक्षाची बैठक बोलावली. त्यांनी उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद बर्धन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मदत करण्याची विनंती केली आहे. आत्तापर्यंत 151 पैकी 120 पर्यटकांशी संपर्क साधला गेला असून, ते आयटीबीपी कॅम्पमध्ये सुरक्षित आहेत. उर्वरित 31 पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. ढगाळ वातावरण आणि मोबाईल नेटवर्कच्या समस्येमुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.

उत्तराखंडमधील बचावकार्यासाठी लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद केंद्र (NDRF), राज्य आपत्ती प्रतिसाद केंद्र (SDRF) आणि स्थानिक बचाव पथके युद्धपातळीवर काम करत आहेत. उत्तराखंड राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व पर्यटकांना हर्षिल हेलिपॅडवरून गंगोत्री येथे बस, वाहने किंवा पायी आणले जात आहे. या मार्गावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी 10 आयटीबीपी तुकड्या तैनात आहेत. प्रत्येक तुकडी 30 यात्रेकरूंना संरक्षण देणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तराखंड प्रशासनाच्या सतत संपर्कात असून, सर्व पर्यटकांना रेल्वे किंवा विमानाने परत आणण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले आहे. त्यामुळे नातेवाईकांनी काळजी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0