
Mira Bhayandar Mayor News : डिंपल मेहतांच्या निवडीला मनसे आणि मराठी एकीकरण समितीचा तीव्र विरोध; शहरात तणावाचे वातावरण
मीरा-भाईंदर | मीरा-भाईंदर महानगरपालिका Mira Bhayandar BMC निवडणुकांनंतर शहरात राजकीय संघर्षाला सुरुवात झाली असून, ‘मराठी महापौर’ या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. भाजपच्या डिंपल मेहता आज महापौरपदाचा पदभार स्वीकारणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, मराठी एकीकरण समिती आणि मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. एमएमआर (MMR) क्षेत्रातील या महत्त्वाच्या महापालिकेत अमराठी महापौर बसवला जात असल्याच्या निषेधार्थ आज महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. Mira Bhayandar Latest News
भाजपच्या घराणेशाहीवर सडकून टीका
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी भाजप आणि स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप केले आहेत. “मीरा-भाईंदर हे आगरी-कोळ्यांचे आणि मराठी माणसांचे शहर आहे. आमदार नरेंद्र मेहता हे येथे घराणेशाही राबवून आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला दुसऱ्यांदा महापौर करत आहेत. हे दुसरे मोरारजी देसाई तयार होत आहेत की काय?” असा संतप्त सवाल देशमुख यांनी केला. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे का, अशीही विचारणा त्यांनी केली.
पोलीस नोटिशीनंतरही आंदोलक ठाम
मराठी एकीकरण समितीने आज सकाळी 10 वाजता सुभाषचंद्र बोस मैदान ते महापालिका मुख्यालय असा भव्य मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप या मोर्चाला परवानगी दिलेली नाही. पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावत आंदोलन मैदानातच मर्यादित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु, आंदोलकांनी ही नोटीस झुगारून लावत महापालिकेपर्यंत मोर्चा नेण्याचा निर्धार केला आहे.
‘मराठी महापौरच हवा’ – मनसेची भूमिका
केवळ मराठी एकीकरण समितीच नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही (MNS) या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी माणसांच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी महापालिकेत मराठी महापौरच असायला हवा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. जर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारला, तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


