
Thane Latest Crime News : क्रिप्टोग्लोबल’ कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून गंडा; सायबर गुन्हेगार सक्रिय
ठाणे :- ऑनलाइन नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 11 लाख 81 हजार 595 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. Thane Latest Fraud News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगाराने स्वतःला ‘क्रिप्टोग्लोबल’ कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. त्याने व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तक्रारदार व्यक्तीशी संपर्क साधला. सुरुवातीला त्याने काही सोपी ऑनलाइन कामे देऊन तक्रारदाराच्या खात्यात 15 हजार 600 रुपये जमा केले. यामुळे तक्रारदाराचा विश्वास संपादन केला.
एकदा विश्वास बसल्यावर, आरोपीने वेगवेगळ्या बँक खात्यांमधून मोठी रक्कम पाठवण्यास सांगितले. तक्रारदाराने बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमधून मोठी रक्कम पाठवली. इतकेच नव्हे, तर कंपनी मालकाच्या खात्यातूनही 4 लाख 80 हजार रुपये पाठवण्यात आले. ही सर्व रक्कम आरोपीने आपल्या यूपीआय आयडीवर ट्रान्सफर करून घेतली.
आरोपीने सुरुवातीला गुंतवलेली रक्कम आणि त्यावरील कमिशन परत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कोणतीही परतफेड न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर तक्रारदाराने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना पाहता, नागरिकांनी अशा कोणत्याही आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


