
Pune Sinhagad Police Latest News : फिल्मी स्टाईलने सीसीटीव्हीचा मागोवा घेत पोलिसांनी दीड महिन्यात केला पर्दाफाश; 8 गुन्ह्यांची उकल
पुणे :- सिंहगड रोड परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत घरफोडी चोराला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून, ‘फिल्मी स्टाईल’ने तपास करत पोलिसांनी या गुन्हेगाराला दीड महिन्यानंतर अटक केली. या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलिसांनी 8 घरफोडींच्या गुन्ह्यांची उकल केली असून, तब्बल 14 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Pune Police Latest News
रात्री 2 ते 5 वाजेदरम्यान ‘चोरटा’ सक्रिय
गेल्या काही महिन्यांपासून सिंहगड रोड परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरटा रात्री 2 ते 5 वाजेदरम्यान काळ्या जॅकेट आणि हेल्मेट घालून येत असे. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांच्या तपास पथकाने या ‘चोरट्या’चा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी शेकडो सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास केला आणि चोरट्याच्या येण्या-जाण्याचा मार्ग शोधून काढला.
चोरीच्या पैशातून घेतली ‘लक्झरी’ कार
पोलीस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर आणि निलेश भोरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी रेवण उर्फ रोहन बिरू सोनटक्के (वय 24, रा. दिघीरोड) याला ताब्यात घेतले. त्याने 8 घरफोड्या केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून 5 लाख 71 हजार 150 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि चोरीच्या पैशातून घेतलेली 6 लाख 70 हजार रुपयांची ‘हुंडाई वेन्यू’ कार जप्त केली. याशिवाय, गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 14 लाख 75 हजार 800 रुपये आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी रेवण सोनटक्के हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे शहर, पुणे ग्रामीण, कोल्हापूर आणि नवी मुंबई येथे यापूर्वीच 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच, त्याच्यावर पोलीस कोठडीतून पळून जाण्याचाही गुन्हा दाखल आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप वाईगडे आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलीस अंमलदार उत्तम तारू, अण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, निलेश भोरडे, सागर शेडगे, विनायक मोहिते, गणेश झगडे, सतीश मोरे, समीर माळवदकर, संदीप कांबळे आणि तानाजी सागर यांनी केली.



