Virar Crime News : हेरॉईन तस्करीतील मुख्य आरोपी अटकेत! 6 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या ‘अजमत’ला बेड्या

•महाराष्ट्र-गुजरात सीमेवरून अटक; गुन्हे शाखा कक्ष-3 विरारची सहा महिन्यांची अथक मोहीम यशस्वी
विरार :- तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या आणि 1 कोटी 8 लाखांच्या हेरॉईन तस्करी प्रकरणातील पाहिजे असलेल्या मुख्य आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-3 (विरार) च्या पथकाने मोठे यश मिळवले आहे. हा आरोपी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसला होता.
नेमकं काय आहे प्रकरण?
बोळींज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यात, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण 324 ग्रॅम वजनाचे हेरॉईन (किंमत सुमारे 1 कोटी 8 लाख 10 हजार ) जप्त करण्यात आले होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी नामे अजमत आरीफ शेख (वय 25, रा. विरार पूर्व) हा तेव्हापासून फरार होता.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रकटीकरण) यांनी हा गंभीर गुन्हा लक्षात घेऊन अजमत शेख याला त्वरित अटक करण्याचे निर्देश दिले होते.
6 महिन्यांच्या अथक परिश्रमाचे यश
गुन्हे शाखा कक्ष-3 च्या अधिकारी व अंमलदार यांनी गेल्या सहा महिन्यांपासून अजमतचा शोध घेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आरोपीचे नातेवाईक आणि परिसरातील लोकांकडे कसून चौकशी करण्यात आली.
अजमत शेख हा अत्यंत हुशारीने आपले मूळ ठिकाण सोडून महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील विविध ठिकाणी वास्तव्य करत होता. त्यामुळे पोलिसांना त्याला शोधण्यात अडथळे येत होते. मात्र, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला.अखेरीस, दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांनी गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील भिलाड परिसरातून अजमत आरीफ शेख याला ताब्यात घेतले.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्यासह अपर पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी अंमली पदार्थ विरोधी कक्ष-1 कडे सोपवण्यात आले आहे.


