मुंबई

Mumbai Crime News : ‘सोनू मेंटल’ला ‘एमपीडीए’चा दणका!

•खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह अनेक गुन्हे; सराईत गुन्हेगार पेशनवाज खान ठाणे मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध!

मिरा-भाईंदर :- मिरा भाईंदर वसई-विरार आयुक्तालय क्षेत्रात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पेशनवाज असरार खान उर्फ ‘सोनू मेंटल’ या सराईत गुन्हेगारावर नयानगर पोलिसांनी महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती अधिनियम 1981 (MPDA) अंतर्गत स्थानबद्धतेची कठोर कारवाई केली आहे. मीरा-भाईंदर, काशीमीरा आणि नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनतेच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण करणाऱ्या या आरोपीला ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सोनू मेंटलचा गुन्हेगारी इतिहास

गेल्या अनेक वर्षांपासून नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असलेला पेशनवाज खान उर्फ सोनू मेंटल (वय 32) हा सराईत गुन्हेगार आहे. सन 2011 पासून त्याच्यावर पुढील गंभीर गुन्हे दाखल आहेत:

खुनाचा प्रयत्न करणे (कलम 307)

जबरी चोरी करताना दुखापत करणे

गैरकायद्याची मंडळी जमवून मारामारी, दुखापत करणे

गंभीर दुखापत करणे आणि शांतता भंग करणे

यापूर्वी आरोपीवर सन 2022 आणि 2023 मध्ये प्रत्येकी सहा महिन्यांसाठी हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली होती. मात्र, तडीपार असतानाही त्याने पुन्हा गुन्हा दाखल करून आपली गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवली. तडीपार असतानाही त्याने पुन्हा खून करण्याचा प्रयत्न करणे (307) आणि शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.

एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धता

सोनू मेंटलच्या सततच्या गुन्हेगारी कारवाया आणि त्यामुळे परिसरात निर्माण झालेले भीतीचे वातावरण पाहता, त्याच्या धोकादायक कृत्यांना आळा घालणे अत्यंत आवश्यक होते. त्यामुळे नयानगर पोलिसांनी त्याच्यावर धोकादायक व्यक्ती या सदराखाली ‘महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, धोकादायक व्यक्ती… अधिनियम 1981 चे कलम 3(1)’ प्रमाणे स्थानबद्धतेचा प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त, मिरा भाईंदर वसई-विरार यांच्याकडे सादर केला होता.

पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, नयानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी सोनू मेंटल याला ताब्यात घेऊन त्याला मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे स्थानबद्ध केले आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर जगदाळे, पोलीस निरीक्षक समीर अहिरराव आणि इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0