Sanjay Raut : “पंतप्रधान फक्त शपथविधीला जातात!” – संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

पंतप्रधान मोदींनी अजूनही मणिपूरमध्ये पाऊल ठेवले नाही; केवळ मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला जातील” — संजय राऊत
मुंबई : देशात सध्या गाजत असलेल्या मणिपूरमधील अस्थिरता, काश्मीर दौरे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.
मणिपूरच्या जमिनीवर पंतप्रधानाचं पाऊल नाही!
“मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे, सामान्य जनता भयभीत आहे. पण पंतप्रधान मोदी तिथे गेलेले नाहीत. मात्र नवीन मुख्यमंत्री शपथ घेणार असतील, तर तिथे हजेरी लावतील,” असा उपरोधिक टोला राऊतांनी लगावला. त्यांनी केंद्रावर हल्ला चढवत म्हटले की, “भाजपकडे तिथे सरकार स्थापनेसाठी वेळ आहे, पण जनतेच्या वेदना ऐकायला नाही!”
“सरकार घाबरली आहे – जनता नाही!”
गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीर दौर्यावर राऊत म्हणाले, “सरकार डरी हुई है, जनता नहीं. तरीही अमित शहा जर काश्मीरला जात असतील, तर त्यांचं स्वागतच. पण त्यांनी आधी दहशतवाद संपवावा.” या विधानातून त्यांनी केंद्र सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि राजकीय हेतूंवर सवाल उपस्थित केला.
3 हजार कोटींचा घोटाळा? भाजपवर थेट आरोप!
सुप्रीम कोर्टाने नुकत्याच एका प्रकरणात केंद्रावर टीका केली. यावर राऊत म्हणाले, “हा 3 हजार कोटींचा घोटाळा भाजपने केला. एक मोठी इंजिनीअरिंग कंपनी हा करार मिळवणार होती. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना वेळेवर थांबवलं.” त्यांनी न्यायव्यवस्थेचं कौतुक करत म्हटलं, “आजही देशात लोकशाहीचा एक मजबूत स्तंभ न्यायपालिका आहे. त्यांनी भाजपला त्यांची ‘औकात’ दाखवली आहे.”
“शरद पवार हे देशहितासाठी लढणारे नेते आहेत”
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रशंसा केली होती. यावर राऊत म्हणाले, “ही स्तुती स्वच्छ मनाने झाली असं वाटत नाही. पण तरीही शरद पवार हे देशहितासाठी नेहमी झटणारे मोठे नेते आहेत.”



