
Mumbai Police Latest News : बीकेसी ते विलेपार्लेपर्यंत पोलिसांचा ‘सर्च ऑपरेशन’; 39 लाख 77 हजारांचा तब्बल 176 मुद्देमाल हस्तगत
मुंबई | नवीन वर्षाच्या स्वागतापूर्वी मुंबई पोलिसांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. परिमंडळ 8 अंतर्गत येणाऱ्या 7 पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला आणि गहाळ झालेला एकूण 39 लाख 77 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल आज सन्मानाने मूळ मालकांना सुपूर्द केला. वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील पासवदान हॉलमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला.
सात पोलीस ठाण्यांची संयुक्त कामगिरी
परिमंडळ 8 मधील बीकेसी, खेरवाडी, निर्मलनगर, वाकोला, विलेपार्ले, सहार आणि विमानतळ या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीसारखे गुन्हे घडले होते. या गुन्ह्यांचा छडा लावून पोलिसांनी आरोपींकडून मौल्यवान दागिने, मोटार वाहने, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू हस्तगत केल्या होत्या. याशिवाय, गहाळ झालेल्या 164 मोबाईलचा तांत्रिक तपास करून ते देखील शोधून काढण्यात आले.
CEIR प्रणालीचा प्रभावी वापर
गहाळ झालेले मोबाईल शोधण्यासाठी पोलिसांनी केंद्र सरकारच्या ‘CEIR’ प्रणालीचा प्रभावी वापर केला. तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी एकूण 176 वस्तू (मुद्देमाल) जमा केल्या होत्या. यामध्ये मोबाईलची संख्या मोठी असून, आपले हरवलेले फोन परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळाले.
मान्यवरांच्या उपस्थितीत मुद्देमाल वाटप
पोलीस उप-आयुक्त मनीष कलवानिया यांच्या हस्ते हा मुद्देमाल संबंधितांना परत करण्यात आला. यावेळी विविध पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. “आपली चोरीला गेलेली मालमत्ता किंवा हरवलेला फोन पुन्हा मिळेल याची आशा अनेकांनी सोडली होती, मात्र पोलिसांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ही मालमत्ता परत मिळाली आहे,” अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले.
परिमंडळ 8 कडून करण्यात आलेल्या या यशस्वी कारवाईमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्यास मदत झाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.



